Join us

'...तरीही एका आईसाठी मुलं नेहमीच राहतात जीवाभावाची', सुप्रिया पिळगांवकर यांनी व्यक्त केल्या भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2021 20:08 IST

सध्या सुप्रिया पिळगांवकर कुछ रंग प्यार के ऐसे भी – नई कहानी मालिकेत ईश्वरी या भूमिकेत पहायला मिळत आहेत.

आईच्या प्रेमाला तोड नसते. ते शुद्ध, निरपेक्ष आणि चिरंतन असते. तुम्ही कितीही मोठे झालात किंवा कितीही दूर गेलात, तरी ती कोणत्याही सीमा पार करून तुमच्यावर प्रेम करत असते. अशीच एक आई, ज्या आपल्या परिचयाच्या आहेत, त्या म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर. ज्या प्रत्यक्षात एका मुलीची आणि पडद्यावर एका मुलाची आई आहे. कुछ रंग प्यार के ऐसे भी – नई कहानी मालिकेत त्यांनी साकारलेल्या ईश्वरी यांच्यामध्ये एका वेगळ्या छटेची आई दिसते. पडद्यावर आई साकारताना आणि प्रत्यक्षात मातृत्वाचा अनुभव घेताना काय वाटते, याबद्दल सुप्रिया यांनी आपले मत मांडले आहे. सुप्रिया पिळगांवकर यांनी सांगितले की, एक आई म्हणून ईश्वरी आपल्या मुलांवर सारखेच प्रेम करते, पण आपणा सर्वांना माहीतच आहे की, देव (शहीर शेख) कडे तिचा विशेष कल आहे. आपल्या आणि आपल्या मुलाच्या नात्यात ती कोणालाच येऊ देत नाही. माझ्या मते, प्रेम आणि काळजी दाखवण्याची प्रत्येक आईची आपली खास पद्धत असते. शेवटी एका आईची इच्छा आपल्या मुलाने आनंदात असावे आणि जीवनात त्याची भरभराट व्हावी हीच तर असते. देवबद्दल ईश्वरीला हेच वाटत असते.”

पुढे त्या म्हणाल्या की, “मला एक मुलगी आहे आणि तिने आई म्हणून माझी निवड केली याबद्दल मला कृतज्ञता वाटते. तिच्या बाबतीत मी खूप प्रोटेक्टिव्ह आहे. तिच्या जीवनात ती जे निर्णय घेते, त्यात मी तिच्यावर विश्वास ठेवते आणि तिला आधार देते. ती एक सुंदर आणि स्वतंत्र स्त्री झालेली पाहताना माझ्या मनाला खूप आनंद होतो. आपल्याला हे माहीत असते की एक ना एक दिवस आपली मुले पाखरासारखी घरट्यातून उडून जाणार आहेत, पण तरीही एका आईसाठी ती मुले नेहमीच जीवाभावाची राहतात.”

कुछ रंग प्यार के ऐसे भी – नई कहानी मालिकेच्या कथानकात आत्ता एका मोठ्या सत्याचा उलगडा झाला आहे आणि संपूर्ण दीक्षित कुटुंबाला त्यामुळे हादरा बसला आहे. एक कुटुंब म्हणून त्यांच्यात काय घडते हे काळच सांगू शकेल.

टॅग्स :सुप्रिया पिळगांवकरश्रिया पिळगावकर