Join us  

'सूरमा' चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2018 1:46 PM

दलजीत दोसांझ आणि तापसी पन्नू यांचा 'सूरमा' चित्रपट छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

ठळक मुद्दे'सुरमा' सिनेमात तापसी पन्नू व दलजीत दोसांझ मुख्य भूमिकेत

फिल्ड हॉकीमध्ये भारताने ऑलिम्पिक्सचे पहिले सुवर्ण पदक पटकावले या गोष्टीला २०१८ मध्ये ९० वर्षे झाली. मात्र, आजही या खेळाबद्दल आपल्याला फारसे काही ठाऊक नाही. हॉकी आणि भारताचा झेंडा उंचावणाऱ्या या खेळाडूंना आजही त्यांचे श्रेय आणि त्यांना मिळायलाच हवे असे कौतुकही मिळत नाही. असाच एक खेळाडू, पेनल्टी कॉर्नर स्पेशालिस्ट आणि भारताच्या राष्ट्रीय हॉकी टीमचा उपकर्णधार संदीप सिंग. फ्लिकर सिंग या नावानेच संदीप सिंग ओळखला जायचा. त्याचे प्रयोग, त्याच्या यातना आणि त्याने मिळवून दिलेला अप्रतिम विजय यामुळे तो हिरो ठरला. मात्र, या महान भारतीय हॉकीपटूला एक देश म्हणून आपणसगळेच विसरलो होतो. त्याच्यावर सिनेमा येईपर्यंत. प्रेरणा आणि ताकदीचे प्रतिक म्हणून चपखल असा हा सिनेमा 'सुरमा' १४ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता सोनी मॅक्स वाहिनीवर झळकण्यास सज्ज आहे. 

चित्रांगदा सिंगची निर्मिती आणि बॉलिवूडमधील लोकप्रिय दिग्दर्शक शाद अलीचे दिग्दर्शन असलेल्या सुरमामध्ये प्रेरणेची ज्योत आहे. भारतीय खेळांमधील विस्मृतीत गेलेल्या एका नायकाचे यश पुन्हा चेतवणारी ज्योत. समीक्षकांनी नावाजलेल्या या सिनेमात दलजीत दुसांज, तापसी पन्नू, अंगद बेदी, सतीश कौशिक आणि विजय राज यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सुरमाचा पंजाबी भाषेतील अर्थ आहे योद्धा. नावाप्रमाणेच, ही पटकथा आंतरराष्ट्रीय हॉकीपटू संदीप सिंगच्या आयुष्यातील कथा मांडते. मृत्यूच्या दारात नेणा-या एका प्रसंगामुळे त्याने आयुष्यातील दोन वर्ष व्हीलचेअरवर काढली. मात्र प्रचंड जिद्द, मेहनत आणि खेळाची निस्सिम आवड या जोरावर तो पुन्हा उभा राहिला. त्यानंतर त्याच्या नेतृत्वाखाली भारताने २००९ सुलतान अझलान शॉ कप जिंकला आणि २०१२ ऑलिम्पिकसाठी आपला संघ पात्र ठरला.

टॅग्स :सूरमातापसी पन्नू