महिलांचे प्रश्न, समस्या, त्यांच्यावरील अत्याचार आदी बातम्या रोज वर्तमानपत्रात वाचायला मिळतात, पण तुम्ही महिलांच्या... नव्हे, तर एका महिलेच्या हुकमतीखाली संपूर्ण गावाचा कारभार चाललेला मराठी चित्रपटात फारच कमी वेळा पाहिला असेल... आणि तेही खलनायिकाच, पण चांगल्या स्वभावाची आणि तेही संपूर्ण गावावर अंकुश ठेवणारी महिला, असे दृश्य पाहायला मिळणे जवळपास अशक्यच. असाच एक महिलाराज असणारा ‘बाय गो बाय’ चित्रपट घेऊन येत आहेत दिग्दर्शक विजय पगारे. त्यातील संपूर्ण गावावर वचक ठेवणाऱ्या महिलेची म्हणजेच बैजाक्काची भूमिका बजावली आहे निर्मिती सावंत यांनी. पूर्वायुष्यात आलेल्या वाईट अनुभवांमुळे तिच्या मनात पुरुषांबद्दल द्वेष निर्माण होतो आणि त्या गावातील पुरुषांना साधी मिशी ठेवण्याचीदेखील परवानगी दिली जात नाहीत. अशा या संपूर्ण गमतीजमती साकारत महिलाराजवर पगारे यांनी तयार केलेला ‘बाय गो बाय’ हा चित्रपट ४ डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे. त्यानिमित्त चित्रपटाचे दिग्दर्शक विजय पगारे, अभिनेता विजय पाटकर, नयन जाधव आणि कृतिका तुळसकर यांनी शुक्रवारी ‘लोकमत’ कार्यालयाला भेट दिली. बैजाक्काच्या भावाची म्हणजेच पोपट ही भूमिका मी साकारली आहे. जी संपूर्ण गावाला धाकात ठेवू शकते, तिच्या धाकात अर्थात मीही असतोच, पण तरीही, त्याच्यामधील बंडखोर वृत्ती अधूनमधून बाहेर येताना यात पहायला मिळेल. - विजय पाटकरअसं म्हणतात की, दोन बायका एकत्र राहू नाही शकत, पण या चित्रपटात आम्हाला १०-१२ महिलांना एकत्र पाहायला मिळेल आणि त्याशिवाय महिला पुरुषांना कशा कामाला लावतात, हेही पाहायला मिळेल. माझी भूमिका पाहिल्यावर निर्मितीतार्इंची आणि त्यांचा अभिनय पाहिल्यावर माझी आठवण होईल.- कृतिका तुळसकरया चित्रपटात मी शिवा नाव असलेल्या एका विदूषकाची आणि चित्रपटातील मुख्य भूमिका साकारत आहे. जो बैजाक्काच्या मुलीच्या प्रेमात पडतो आणि मग अखेरीस श्यामाशी लग्न करण्यासाठी बैजाक्काची परवानगी मिळविण्यात यशस्वी होतो. - नयन जाधव
स्त्रीशक्तीचा विनोदी बाज ‘बाय गो बाय’
By admin | Updated: November 29, 2015 01:40 IST