ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 22 - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अटी 'सिनेमा प्रोड्युसर्स असोसिएशन'ने मान्य केल्यानंतर अखेर 'ए दिल है मुश्किल' सिनेमाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. मनसेनं जरी 'ए दिल...'ची रोखून धरलेली वाट मोकळी केली असली तरी सिनेमा ओनर्स अँड एक्झिबिटर्स असोसिएशनचा सिनेमा विरोध अद्याप कायम असल्याने सिनेमाचे भवितव्य अद्यापही अंधारातच आहे, असेच दिसते.
'करण जोहरच्या ए दिल है मुश्किल सिनेमाच्या प्रदर्शनसाठी आम्ही सहकार्य करणार नाही', असे सिनेमा ओनर्स अँड एक्झिबिटर्स असोसिएशनचे अध्यक्ष नितीन दातार यांनी स्पष्ट केले आहे. उरी हल्ल्यात 20 जवान शहीद झाल्याच्या पार्श्वभूमीवर संताप व्यक्त करत 'पाकिस्तानी कलाकार असलेले एकही सिनेमे दाखवणार नाही', अशी भूमिका सिनेमा ओनर्स असोसिएशनने याआधीच घेतली होती. त्यामुळे ' ए दिल...'सिनेमाला विरोध करत सिनेमा ओनर्स असोसिएशनने आपल्या भूमिकेवर ठाम आहे.
आणखी बातम्या
We are not going to co-operate with release of Karan Johar's #ADHM: Nitin Datar, Pres. of Cinema Owners & Exhibitors' Association to ANI— ANI (@ANI_news) October 22, 2016
'मनसे'ने सिनेमा प्रोड्युसर्स असोसिएशनला घातलेल्या अटी
'भविष्यात कोणत्याही पाकिस्तानी कलाकार, गायक, तंत्रज्ञ यांना बॉलिवूडमध्ये प्रवेश मिळणार नाही हे लिहून द्या अशी अट दिग्दर्शक- निर्मात्यांपुढे ठेवली व त्यांनी ती मान्य केली आहे', असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
तसेच 'जे निर्माते पाकिस्तानी कलाकारांना घेऊन सिनेमे बनवत आहेत त्यांनी प्रायश्चित म्हणून प्रत्येकी पाच कोटी रुपये आर्मी वेलफेअर फंडासाठी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्याकडे जमा करावेत', अशीही मागणी राज ठाकरे यांनी केली आहे. शिवाय 'ए दिल है मुश्किल' सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी उरी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहणारी पाटी दाखवावी, अशी अटदेखील मनसेने घातली आहे.
- भविष्यात पाकिस्तानी कलाकार, गायक, तंत्रज्ञ यांना बॉलिवूडमध्ये प्रवेश देणार नाही, तसे लेखी स्वरुपात लिहू द्या.
- सिनेमा निर्मात्यांनी प्रायश्चित म्हणून आर्मी वेल्फेअर फंडला प्रत्येकी पाच कोटी रूपये द्यावे.
- सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी भारतीय जवानांना आदरांजली वाहणारी पाटी दाखवावी.