Join us

अखेर सुपरस्टार विजय सेतुपतिने सोडला मुथैया मुरलीधरनचा बायोपिक '८००', जाणून घ्या कारण!

By अमित इंगोले | Updated: October 20, 2020 09:42 IST

नेटीजन्स, तमिळ संघटना, राजकीय पक्ष आणि फिल्म इंडस्ट्रीतीली अनेक मोठ्या लोकांनी विरोध केल्यावर विजय सेतुपतिने एक लेटर रिट्विट करत घोषणा केली आहे की, तो आता या सिनेमाचा भाग नाही.

श्रीलंकेचा महान क्रिकेटर मुथैया मुरलीधरन याच्या जीवनावर आधारित '८००'मुळे वाढत असलेल्या वादामुळे अखेर तमिळ सुपरस्टार विजय सेतुपतिने हा सिनेमा सोडण्याचा निर्णय घेतलाय. वादाचं एक मोठं कारण म्हणजे विजय सेतुपतिने मुथैया मुरलीधरनची भूमिका साकारण्याला होकार देणं हे आहे. पण नंतर नेटीजन्स, तमिळ संघटना, राजकीय पक्ष आणि फिल्म इंडस्ट्रीतीली अनेक मोठ्या लोकांनी विरोध केल्यावर विजय सेतुपतिने एक लेटर रिट्विट करत घोषणा केली आहे की, तो आता या सिनेमाचा भाग नाही.

धन्यवाद....अलविदा...

विजय सेतुपतिने मुथैया मुरलीधरनचं ट्विट रिट्विट करत लिहिले की, 'धन्यवाद...अलविदा...'. या नोटमध्ये मुथैयाने विजय सेतुपतिला ८०० मधून माघार घेण्याची विनंती केली आहे. तो म्हणाला की, त्याची अजिबात इच्छा नाही की, तमिळ सिनेमाच्या महान कलाकाराचं करिअर अडचणीत यावं. त्यामुळे त्याने विजयला हा सिनेमा सोडण्याची विनंती केली आहे. आणि ती विजयने स्वीकारली सुद्धा आहे. (मुथैया मुरलीधरनचा बायोपिक '800' वर बॉयकॉटची मागणी, म्हणाला - '...तर टीम इंडियासाठी खेळलो असतो')

काय आहे वादाचं कारण?

मुथैया मुरलीधरनने श्रीलंकेतील सिव्हिल वॉरवेळी तेथील सरकारचं समर्थन आणि तमिळ आतंकवादी संघटना एलटीटीईला विरोध केला होता. त्यावेळी एलटीटीई विरोधात केलेल्या वक्तव्यामुळेच तमिळ इंडस्ट्रीतील लोक मुथैया मुरलीधरनच्या बायोपिकला विरोध करत आहे. आपल्या ऑफिशिअल स्टेटमेंटमध्ये तो म्हणाला की, त्याचं आयुष्य नेहमीच वादांनी वेढलेलं राहिलं आणि त्याच्यासाठी ही काही नवीन बाब नाही.

मुरलीधरनचा संघर्ष दाखवणारा सिनेमा

मुथैया म्हणाला की, 'जेव्हा प्रॉडक्शन हाऊसने सर्वातआधी सिनेमासाठी मला सपंर्क केला तेव्हा मी यासाठी तयार नव्हतो. नंतर मी विचार केला की, हा सिनेमा माझ्या पालकांचा संघर्ष, माझ्या कोचचं योगदान आणि माझ्या जीवनाशी संबंधित लोकांबाबत दाखवणार आहे. माझ्या परिवाराने एका चहाच्या मळ्यात राहून आपल्या जीवनाला सुरूवात केली होती. ३० वर्षांच्या सिव्हिल वॉरचा श्रीलंकेच्या या भागात राहणाऱ्या तमिळ लोकांवर फार वाईट प्रभाव पडला. ८०० या सिनेमात दाखवण्यात येणार आहे की मी या समस्या कशा पार केल्या आणि क्रिकेटमध्ये कसं यश मिळवलं'.

'तमिळ लोकांच्या हत्येचा कधी सपोर्ट केला नाही'

श्रीलंका सरकारचं समर्थन आणि एलटीटीईचा विरोध यावर मुथैया म्हणाला की, 'माझ्यावर अनेक आरोप लावण्यात आले की, मी तमिळ लोकांच्या हत्येचा सपोर्ट केला. पहिल्यांदा जेव्हा मी २००९ मध्ये एक वक्तव्य केलं होतं ते माझ्या आयुष्यातील बेस्ट वर्ष होतं. गैरसमज करून घेण्यात आला की, मी तमिळ नरसंहारचा जल्लोष केला. ज्या व्यक्तीने आपलं आयुष्य वॉर झोनमध्ये घालवलं त्याच्यासाठी युद्ध संपणं ही चांगली बाब असते. मला आनंद होता की, त्या १० वर्षात दोन्हीकडील कुणाचाही जीव गेला नाही. मी कधीच हत्येचं समर्थन केलं नाही आणि करणारही नाही. सिंहली बहुसंख्यांक श्रीलंकेत एक अल्पसंख्यांक म्हणून राहताना तमिळ लोकांनी आपल्या सन्मानाची लढाई लढली. माझे पालक स्वत:ला दुसऱ्या दर्जाचे नागरिक समजत होते आणि मी सुद्धा समजत होतो. क्रिकेटमध्ये यश मिळवल्यानंतर मी विचार केला की, माझे तमिळ साथीदारही माझ्याप्रमाणे पुढे जाऊन सन्मान मिळवतील'. 

टॅग्स :Tollywoodआत्मचरित्र