Join us

OMG घर चालवण्यासाठी कपूर कुटुंबियातील या सदस्याला विकाव्या लागल्या होत्या घरच्या वस्तू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2020 13:28 IST

कपूर कुटुंबियातील या सदस्याने अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.

ठळक मुद्देशशी कपूर यांच्याकडे पैसे नव्हते आणि त्यामुळे त्यांना घर चालवण्यासाठी घरातील अनेक गोष्टी विकाव्या लागल्या होत्या. शशी कपूर यांचा मुलगा कुणालनेच एका मुलाखतीत याविषयी सांगितले होते.

शशी कपूर यांची आज 82 वी जयंती असून त्यांनी बॉलिवूडमधील अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले. त्यांच्या अनेक भूमिकांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. शशी कपूर यांनी 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आणि त्यातील अधिकाधिक चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. 1998 मध्ये त्यांनी साईड स्ट्रीट या चित्रपटात शबाना आझमी यांच्यासोबत काम केले. त्यानंतर ते अभिनयक्षेत्रापासून दूर गेले. 

शशी कपूर यांचे निधन ४ डिसेंबर 2017 मध्ये झाले. त्यांच्या निधनाने बॉलिवूडला चांगलाच धक्का बसला होता. शशी कपूर हे राज कपूर यांचे भाऊ होते. त्यांनी चित्रपटसृष्टीतील एक खूप चांगला काळ पाहिला. पण तुम्हाला माहीत आहे का, शशी कपूर यांच्या आयुष्यात एक अशी वेळ देखील आली होती की, ज्यावेळी शशी कपूर यांच्याकडे पैसे नव्हते आणि त्यामुळे त्यांना घर चालवण्यासाठी घरातील अनेक गोष्टी विकाव्या लागल्या होत्या. शशी कपूर यांचा मुलगा कुणालनेच एका मुलाखतीत याविषयी सांगितले होते. 

कुणालने मुलाखतीत सांगितले होते की, माझे वडील म्हणजेच शशी कपूर यांना साठीच्या दशकात काम मिळणे बंद झाले होते. घराची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट होती. घर कसे चालवायचे याची चिंता माझ्या वडिलांना आणि आईला लागली होती. त्याकाळातील कोणतीच आघाडीची अभिनेत्री माझ्या वडिलांसोबत काम करायला तयार नव्हती. त्यामुळे घर चालवण्यासाठी माझ्या वडिलांना त्यांची महागडी गाडी विकावी लागली होती. एवढेच नव्हे तर माझ्या आईला देखील तिला प्रिय असलेल्या अनेक गोष्टी विकाव्या लागल्या होत्या. तो काळ आमच्या कुटुंबियांसाठी खूप वाईट होता. पण नंदा यांनी माझ्या वडिलांसोबत जब जब फुल खिले या चित्रपटात काम करण्यासाठी होकार दिला आणि आमची परिस्थिती पूर्णपणे बदलली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. त्यानंतर माझ्या वडिलांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. 

टॅग्स :शशी कपूर