'पंचायत' वेबसीरिजच्या मेकर्सने अर्थात TVF ने काहीच दिवसांपूर्वी त्यांच्या आगामी वेबसीरिजची घोषणा केली. 'ग्राम चिकित्सालय' (Gram Chikitsalay) असं या वेबसीरिजचं नाव आहे. काहीच दिवसांपूर्वी पोस्टर रिलीज करुन ही खास सीरिज लवकरच येणार असल्याची घोषणा TVF ने केली. अखेर नुकतंच या वेबसीरिजचा खास ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अमोल पराशर आणि विनय पाठक यांची प्रमुख भूमिका असलेली ही वेबसीरिज खळखळून हसवणार यात शंका नाही.
'ग्राम चिकित्सालय'चा ट्रेलर
'ग्राम चिकित्सालय'च्या ट्रेलरमध्ये कथेची छोटीशी झलक पाहायला मिळते. डॉ. प्रभात (अमोल पाराशर) हा एक शहरी डॉक्टरच्या भटकंडी गावात येतो. या गावातील जवळपास बंद पडलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राला पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी तो दाखल होतो. ट्रेलरमध्ये आपल्याला ग्रामीण भागातील संघर्ष, स्थानिक राजकारण, औषधांची कमतरता आणि लोकांच्या शंका यांच्यातून वाट काढणारा डॉ. प्रभात दिसतो. केवळ रुग्णांची सेवा नाही, तर गावकऱ्यांचा विश्वास जिंकण्याचं महत्वाचं आव्हान, डॉ. प्रभातकडे असतं. हा २ मिनिटांचा ट्रेलर प्रेक्षकांना खळखळून हसवतो.
कधी रिलीज होणार 'ग्राम चिकित्सालय'?
'ग्राम चिकित्सालय' वेबसीरिजमध्ये अमोल पराशर, विनय पाठक यांची प्रमुख भूमिका आहे. या दोघांच्या अभिनयाची जुगलबंदी प्रेक्षकांच्या मनात गुदगुल्या निर्माण करणारी आहे. राहुल पांडे यांनी या वेबसीरिजचं दिग्दर्शन केलंय. TVF च्या याआधी रिलीज झालेल्या सर्व वेबसीरिजसारखी ही नवी सीरिज प्रेक्षकांना मातीशी जोडणाऱ्या कथानकाचा अनुभव देत आहे. ९ मे रोजी प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही सीरीज रिलीज होईल.