'पंचायत' या ओटीटीवरील गाजलेल्या वेब सीरिजचा चौथा सीझन अलिकडेच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. इतर सीझनप्रमाणेच 'पंचायत ४' देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. या सीझनमध्ये सचिवजी आणि रिंकीची लव्हस्टोरीही थोडी फुलताना दिसली. खरं तर 'पंचायत ४'मध्ये रिंकी आणि सचिवजींचा किसिंग सीनही असणार होता. मात्र यासाठी रिंकीची भूमिका साकारणाऱ्या सानविकाने नकार दिला. यावर आता अभिनेता जितेंद्र कुमारने मौन सोडलं आहे.
'पंचायत'मध्ये सचिवजींची भूमिका साकारून जितेंद्र कुमारने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. जितेंद्र कुमारने 'पंचायत ४'मधल्या रिंकीसोबतच्या किसिंग सीनवर भाष्य केलं. तो म्हणाला, "सानविकाचं म्हणणं चुकीच्या पद्धतीने घेतलं गेलं आहे. जेव्हा मला या सीनबाबत सांगितलं गेलं तेव्हा मी मेकर्सला म्हटलं की आधी सानविकाला विचारा. या सीनसाठी तिची सहमती असणं गरजेचं आहे. आम्हाला हा सीन मजेशीर करायचा होता. किस केल्यानंतर लाइट जाणार होती. पण, नंतर वेगळ्या पद्धतीने सीन शूट केला गेला".
"मी शुभमंगल सावधानमध्ये आयुष्मान खुरानाला किस केलं होतं. मी याआधीही किसिंग सीन दिले आहेत. एक अभिनेता असल्यामुळे मला याबाबत काहीच आक्षेप नाही. पण किसिंग सीन असो किंवा इतर कोणताही सीन कथेनुसार असला पाहिजे. त्यामध्ये मजा यायला हवी", असंही जितेंद्र कुमारने सांगितलं.
किसिंग सीनबद्दल काय म्हणाली होती सानविका?
"पहिल्यांदा जेव्हा स्क्रीप्ट ऐकवली तेव्हा मेकर्सने मला किसींग सीनविषयी काहीही सांगितलं नव्हतं. नंतर दिग्दर्शकाने मला सांगितलं. मी म्हटलं की मला विचार करायला दोन दिवस हवे आहेत. मी विचार केला आणि मला वाटलं की पंचायतचे फॅमिली ऑडियन्स आहेत. त्यांना हे कसं वाटेल? मग मी त्यांना नकार दिला. नंतर सेटवर शूट करताना तो सीन हटवला गेला. पण मग त्यांनी तो पाण्याची टाकीवाला सीन ठेवला. ज्यात आम्ही फक्त एकमेकांच्या जवळ येतो असं दाखवलं आहे. आपण हे चुकीच्या पद्धतीने दाखवणार नाही असं त्यांनी मला सांगितलं होतं. पण ते करताना थोडं विचित्र वाटतंच. पण जितू खूप चांगला आहे. त्याने मला कंफर्टेबल केलं. आम्ही मग शूटही त्याच पद्धतीने केलं ज्यात आम्ही किस करत नाही पण एकमेकांच्या जवळ येऊन किस केल्यासारखंच ते दिसतं".