Panchayat 4 : ओटीटी प्लॅटफॉर्मवरील प्रेक्षकांच्या सर्वात आवडत्या पंचायत वेब सीरीजच्या चौथा सीझनही अलिकडेच प्रदर्शित झाला. प्रेम, मैत्री आणि राजकारणाची कथा उलगडणाऱ्या या सीरिजने अनेकांना वेड लावलं. या सीरीजमधील प्रत्येक कलाकाराच्या कामाचं सर्वत्र कौतुक होताना दिसतंय. दरम्यान, या चौथ्या सीझनमध्ये एका नव्या पात्राने सगळ्याचं लक्ष वेधून घेतलं. या पात्राशिवाया पंचायतचा चौथा सीझन अपूर्णच वाटला असता, असं म्हणणं वावगं ठरणार आहे. ते पात्र म्हणजे फुलेरा गावच्या नानाजीचं आहे.
फुलेरा गावच्या मंजू देवीच्या वडिलांची म्हणजे नानाजींची भूमिका प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक राम गोपाल बजाज (Ram Gopal Bajaj) यांनी साकारली आहे. 'पंचायत ४' मध्ये नानाजींच्या भूमिकेतून त्यांनी समीक्षकांची वाहवा मिळवली. या सीरीजमधील त्यांच्या डायलॉग्जची प्रचंड क्रेझ निर्माण झाली आहे. 'आशीर्वाद कोई जादू टोना थोड़ी ना है, जैसी करनी वैसी भरनी', 'जो जैसा काम करेगा, वैसा फल पाएगा'... हे त्यांचे डायलॉग प्रत्येकाच्या तोंडपाठ झाले आहेत.'पंचायत ४' च्या सीरीजमध्ये नानाजींचे काही कमीच सीन्स आहेत. मात्र, त्या १० मिनिटांच्या सीनमध्ये त्यांनी संपूर्ण फुलेराची भविष्यवाणी सांगितली. शिवाय त्यांनी गावकऱ्यांनी अनेक महत्त्वाचे सल्लेही दिले. नानाजींनी या सीरीजच्या माध्यमातून समाजाला आरसा दाखवला आहे. निवडणुकीच्या वेळी नेते मंडळी आश्वासनं देतात आणि त्यानंतर ते गायब होतात.
कोण आहेत राम बजाज?
'पंचायत ४' मधील नानाजी अर्थात राम गोपाल बजाज हे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) चे माजी डायरेक्टर आहेत. त्याचबरोबर ते दिवंगत अभिनेता इरफान खानचे गुरू होते. राम गोपाल बजाज यांनीच इरफानला अभिनयाचं प्रशिक्षण दिलं आहे. इतकंच नाहीतर 'पंचायत' मधील बहुतेक कलाकारांनी NSD मध्ये शिक्षण घेतलं आहे. रघुवीर यादव, नीना गुप्ता, सुनीता राजवार, पंकज झा आणि दुर्गेश कुमार हे सगळे NSD चे विद्यार्थी आहेत. हे सर्व कलाकार राम गोपाल बजाज यांच्या पाया पडतात. कलाविश्वातील योगदानाबद्दल राम गोपाल बजाज यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय.
राम गोपाल बजाज यांना अनेक सर्वोच्च पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. ते हिंदी कलाविश्वातील एक मोठं नाव आहे. तसंच त्यांनी 'जॉली एलएलबी २' मध्ये ते वकील रिझवी साहब यांच्या भूमिकेत दिसले होते. शिवाय 'शेफ' चित्रपटात त्यांनी सैफ अली खानच्या वडिलांची भूमिका साकारली होती. याशिवाय 'मासूम', 'चांदणी', 'द मिथ' आणि 'हिप हिप हूर्रे' या चित्रपटांमध्येही झळकले आहेत.