Join us

आर्यन खानने 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' दिग्दर्शित केली नाही? या चर्चांवर मुख्य अभिनेत्री म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 09:22 IST

आर्यन खानवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना अभिनेत्रीचं उत्तर

आर्यन खान सध्या त्याच्या पदार्पणामुळे चर्चेत आहे. 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' ही सीरिज त्याने दिग्दर्शित केली आहे. आर्यनने आपल्या पहिल्याच सीरिजमध्ये अनेक दिग्गजांचे कॅमिओ घेतले आहेत. शाहरुख, सलमान आणि आमिर तिघांचेही वेगवेगळे कॅमिओ आहेत. राजामौली, करण जोहर, अर्शद वारसीही आहेत. तर लक्ष्य लालवानी, राघव जुयाल, सेहर बंबा, आन्या सिंह, मनोज पाहवा, मोना सिंह आणि बॉबी देओल यांचीही मुख्य भूमिका आहे. आर्यनच्या या सीरिजचं खूप कौतुक होत आहे. मात्र आर्यनच्या दिग्दर्शनावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सीरिज खरंच त्याने दिग्दर्शित केली का अशी शंकाही उपस्थित होत आहे. यावर आता अभिनेत्री आन्या सिंहने प्रतिक्रिया दिली आहे.

आन्या सिंहने सीरिजमध्ये लक्ष्यच्या मॅनेजरची भूमिका साकारली आहे. आर्यन खानच्या दिग्दर्शनावर प्रश्न उपस्थित होताच आन्या म्हणाली,"मला वाटतं इतरांना खाली खेचण्यासाठी लोकांना फक्त एक संधी हवी असते. आर्यन कौतुकासाठी पात्र आहे कारण त्याने खरोखरंच सुंदर काम केलं आहे. त्याने या प्रोजेक्टवर खूप मेहनत घेतली आहे. सकाळी ७ पासून ते रात्री ११ पर्यंत त्याची एनर्जी कधीच कमी झाली नाही. तुम्ही त्याला कधीही थकलेलंही पाहणार नाही. त्याच्या चेहऱ्यावर कायमच स्माईल असते आणि कामावर लक्ष केंद्रित असतं."

ती पुढे म्हणाली, "आर्यनला हवं असतं तर त्याने टेक्निशियनची फौजच आजूबाजूला ठेवली असती. पण त्याने स्वत:ची एक टीम बनवली ज्यात त्याने तरुण, टॅलेंटेड अशा लेखक आणि डीओपींना संधी दिली. लोक बोलणार हे त्यालाही माहित होतं आणि त्याच्या व्हिजनवर कोणी प्रश्न उपस्थित करु नये अशी त्याची इच्छा होती. मी त्याचा खूप आदर करते."

आर्यन खानने 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'सीरिजचं लेखन आणि दिग्दर्शन दोन्ही केलं आहे. त्याने संवादही लिहिले आहेत. बिलाल सिद्दीकी आणि मानव चौहान हे सीरिजचे सहायक लेखक आणि क्रिएटर्स आहेत. सीरिजचा क्लायमॅक्स तर अगदीच अनपेक्षित आहे. 

टॅग्स :आर्यन खानवेबसीरिजसेलिब्रिटी