मुंबई - लॉकडाऊनचा रियल हिरो म्हणून अभिनेता सोनू सूदने प्रत्येक भारतीयांच्या मनात घर केलंय. पडद्यावर व्हिलनची भूमिका निभावणारा हा अभिनेता खऱ्या अर्थाने हिरो बनला ते कोरोना काळात. सोनूच्या याच स्वभावामुळे त्याच्यावर चाहते प्रचंड प्रेम करतात. तर, सोनूचं हे मदतीच काम अद्यापही सुरूच आहे. आजही तो देशातील गोरगरीब पीडित जनतेसाठी, त्यांच्या अडचणींमध्ये मदतीला धावतो. तर, टँलेट असलेल्या सर्वसामान्यांना संधी देण्याचंही काम करतो. सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेल्या बिहारच्या अमरजीतचा व्हिडिओ पाहून सोनू सूदलाही आनंद झाला सोनूने अमरजीतला थेट ऑफर देत मोठ्या करिअरच्या संधी उपलब्ध करुन दिल्या आहेत.
सध्याचं युग हे इंटरनेट आणि सोशल मीडियाचं युग आहे. त्यामुळे जगाच्या एका कोपऱ्यात घडत असलेली गोष्ट इंटरनेटच्या स्पीडपेक्षाही जास्त वेगाने जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत पोहोचते. सोशल मीडिया हा एक असा मंच आहे जिथे कोणत्याही प्रकारच्या गोष्टींना मज्जाव केला जात नाही. त्यामुळे सोशल मीडियावर अनेक गोष्टी झपाट्याने व्हायरल होत असतात आणि त्याचा साऱ्यांना आनंद घेता येतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून कानाकोपऱ्यात लपलेले टॅलेंट म्हणजे एखाद्याची प्रतिभा नक्कीच प्रकाशझोतात येते. शेतात गाणं म्हणणाऱ्या अमरजीतचही नशिब असच उदयाला आलंय.
अमरजीतचा व्हिडिओ व्हायरल
भारतात प्रतिभेची कमतरता नाही. प्रतिभावान लोक फक्त एक संधी शोधत असतात. आता, सोशल मीडिया त्यांना ही संधी देत आहे. लाखो लोक दररोज त्यांचे व्हिडिओ Instagram, YouTube, Twitter वर अपलोड करत असतात. त्यातच आता बिहारच्या अमरजीतच्या गाण्याची क्लिप इंटरनेटवर व्हायरल होताना दिसत आहे. व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये अमरजीत शेतात गाणे म्हणत आहे. त्याच्या हातात टूथब्रश आहे आणि दोन मुले आजूबाजूला आहेत. असे दिसते की दात घासताना त्याने फक्त गाणे गायले आणि व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि इंटरनेटवर शेअर केला.
या क्लिपमध्ये गाणारा मुलगा आहे अमरजीत जयकर. तो २००४ मध्ये आलेल्या 'मस्ती' चित्रपटातील 'दिल दे दिया है' हे हिट गाणे गाताना दिसत आहे. त्याचा आवाज इतका अप्रतिम आहे की तुम्हीही त्याचे नक्कीच चाहते व्हाल. याचंच एक उदाहरण म्हणजे, बॉलिवूड अभिनेत्री नीतू चंद्रा श्रीवास्तव हिने २१ फेब्रुवारीला तिचा व्हिडिओ शेअर केला आणि ट्विटरवर लिहिले की- "हा मुलगा कोण आहे? अप्रतिम. कृपया याचा नंबर माझ्याशी शेअर करा. मला नंबर पाठवा."