Join us

55 कोटी नेट वर्थ पण मानसिक शांतता नाही; 7 व्या वर्षी वडिलांचं छत्र हरपलं अन् आता लेक...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2023 13:27 IST

विजयने खूप प्रसिद्धी मिळवली आहे पण वैयक्तिक आयुष्यात तो लहानपणापासूनच आनंदाचा शोध घेत आहे.

आयुष्यात सर्वकाही असेल आणि आनंदच नसेल तर सर्वकाही निरर्थक वाटतं. इतर सुखसोयी कमी असल्या तरी मानसिक शांतता सर्वात महत्वाची आहे. कोणाकडे कितीही पैसा असला तरी तो आनंद कधीच विकत घेऊ शकत नाही. असंच एक उदाहरण दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पाहायला मिळालं. एक प्रसिद्ध अभिनेता ज्याच्याकडे आलिशान जीवन जगण्यासाठी पैसा आहे पण शांतता नाही. हा प्रसिद्ध अभिनेता म्हणजे विजय अँटोनी. विजयने खूप प्रसिद्धी मिळवली आहे पण वैयक्तिक आयुष्यात तो लहानपणापासूनच आनंदाचा शोध घेत आहे.

विजय अँटोनीचा जन्म 25 जुलै 1975 रोजी तामिळनाडूमध्ये झाला. विजयने साऊंड मिक्सिंग इंजिनिअर म्हणून काम सुरू केलं. यानंतर त्याने संगीतकार, गायक, अभिनेता, डबिंग आर्टिस्ट, निर्माता, दिग्दर्शक म्हणून साऊथ इंडस्ट्रीट स्वत:चं खूप नाव कमावलं. विजयचे चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडतात आणि त्याला सामान्य लोकांशी जोडलेला कलाकार म्हटलं जातं.

अँटोनीकडे पाहून कोणीही म्हणू शकतं की त्याच्याकडे सर्व काही आहे, प्रसिद्धीपासून पैशांपर्यंत कोणतीही कमतरता नाही. पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर नजर टाकली तर त्याने लहानपणापासून दु:ख पाहिलं आहे. रिपोर्ट्सनुसार, तो 7 वर्षांचा असताना त्याच्या वडिलांनी आत्महत्या केली होती. विजयवर बालपणीच दु:खाचा डोंगर कोसळला होता. तो वडिलांशिवाय आईसोबत आयुष्य जगला.

बालपणातील त्रासानंतर विजयने स्वत:चं करिअर घडवलं. आज त्याच्याकडे सर्व काही आहे. पण नशीबाने त्याच्यासाठी काहीतरी वेगळंच ठरवलं होतं. 48 वर्षीय विजयला त्याची 16 वर्षांची मुलगी मीराने आत्महत्या केल्याने मोठा धक्का बसला आहे. 19 सप्टेंबर रोजी मीराने चेन्नईतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. विजयची एकूण संपत्ती 55 कोटी रुपये आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.