Join us
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ अभिनेते शम्मी कपूर जयंती

By admin | Updated: October 21, 2016 10:24 IST

अनोखी अदा, उत्तम नृत्याविष्कार आणि रोमँटिक अंदाजामुळे तरूणींना घायाळ करणारे ज्येष्ठ अभिेनेते शम्मी कपूर यांची आज (२१ ऑक्टोबर) जयंती.

प्रफुल्ल गायकवाड
मुंबई, दि. २१ - अनोखी अदा, उत्तम नृत्याविष्कार आणि रोमँटिक अंदाजामुळे तरूणींना घायाळ करणारे ज्येष्ठ अभिेनेते शम्मी कपूर यांची आज (२१ ऑक्टोबर) जयंती.  इ.स. १९५० आणि इ.स. १९६० च्या दशकांमध्ये त्यांचे यशस्वी चित्रपट झळकले.
 
शम्मी यांचा जन्म २१ ऑक्टोबर १९३१ साली मुंबईत झाला तेव्हा त्याचे नामकरण शमशेर राज कपूर असे झाले. त्याकाळातील नाटक तसेच सिनेमाचे प्रसिद्ध कलावंत पृथ्वीराज कपूर यांच्या तीन मुलांपैकी शम्मी हे दुसरे अपत्य (दुसरे दोन - राज कपूर आणि शशी कपूर). तीनही भावंडांनी आपल्या वडिलांप्रमाणेच हिंदी सिनेसृष्टीत अपार यश संपादन केले.
 
शम्मीने अनेक विनोदी, खेळकर, तसेच रोमांचक प्रेमकथांवर आधारित चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका केल्या; इ.स. १९६० च्या दशकात आपल्या आगळ्या नृत्यशैली, तसेच लकबी आणि दिमाखदार व्यक्तिमत्त्वावासाठी शम्मी कपूरला बरेच जण भारताचा एल्विस प्रिसली म्हणत.
 
शम्मीने अभिनयाची सुरूवात गंभीर भूमिकांपासूनच केली, पण फिल्मिस्तानच्या नासिर हुसेन - दिग्दर्शित तुमसा नही देखा (इ.स. १९५७ अमितासोबत) आणि दिल देके देखो (इ.स. १९५९ आशा पारेखसोबत), ह्या चित्रपटांनंतर शम्मीची एका खेळकर प्लेबॉयची प्रतिमा तयार झाली. जंगली (इ.स. १९६१)मुळे ही प्रतिमा दृढावत गेली आणि नंतरचे बहुतेक चित्रपट ह्याच धर्तीवर आधारित होते. शम्मी कपूर हे आपले पार्श्वगायक म्हणून नेहमी मोहम्मद रफीची निवड करीत. मोहम्मद रफी आणि शम्मी कपूर अतिशय चांगले मित्र होते. आपल्या यशाचे श्रेय मोठ्या प्रमाणात मोहम्मद रफीकडे असल्याचे प्रांजळ मत शम्मी कपूर व्यक्त करत. विशेषत: जंगली (इ.स. १९६१) मधील "याहू !!! चाहे कोई मुझे जंगली कहे" हे सिनेमात शम्मी कपूरच्या धुम-धडाका आणि माकडउड्यांनी तुफान लोकप्रिय झालेले गाणे रफींच्याच आवाजात आहे. गतकाळात शम्मीला प्रसिद्ध अभिनेत्रींबरोबर दुय्यम दर्जाच्या भूमिका पत्कराव्या लागल्या (उदा. मधुबालासोबत रेलका डिब्बा). तरी इ.स. १९६० च्या दशकात निर्माते त्याची जोडी मोठ्या नायिका - विशेषत: आशा पारेख, सायरा बानू आणि शर्मिला टागोर बरोबर बनवीत असत. आपल्या सर्व नायिकांपैकी शर्मिला टागोर, राजश्री आणि आशा पारेख बरोबर सहज काम जमायचे असे ते म्हणत. शम्मी कपूर आणि आशा पारेख ची जोडी चार चित्रपटांमध्ये एकत्र दिसली, त्यापैकी तीसरी मंजिल (इ.स. १९६६) हा विजय आनंद दिग्दर्शित आणि राहुल देव बर्मन यांचे बहारदार संगीत असलेला थरारक रहस्यपट सर्वात जास्त गाजला.
 
पण तीसरी मंजिल (इ.स. १९६६)च्या चित्रीकरणादरम्यान गीता बाली या शम्मीच्या पहिल्या पत्नीचे 'देवी'च्या आजारामुळे निधन झाले आणि वैयक्तिक जीवनात शम्मीला आणि त्यांच्या दोन मुलांना एका खरोखरच्या शोकांतिकेचा सामना करावा लागला. त्यानंतर शम्मीचा मुमताज हिच्याबरोबर संबंध जुळले, पण तेही फार काळ टिकले नाहीत. पुढे इ.स. १९६९ साली शम्मीने 'नीला' हिच्याबरोबर दुसरे लग्न केले. त्यांची 'रोमँटिक हीरो'ची कारकिर्द इ.स. १९७०च्या दशकात शरीराच्या वाढत्या स्थूलपणामुळे संपुष्टात आली. अंदाज (इ.स. १९७१) हा शम्मीचा नायक म्हणून शेवटचा गाजलेला चित्रपट ठरला. ७० च्या दशकात ते यशस्वी चरित्र-अभिनेता म्हणून काम करू लागले. जंगली (इ.स. १९६१) आणि ब्लफ मास्टर (इ.स. १९६४) मध्ये ज्या सायरा बानू बरोबर नायकाचे काम केले होते तिच्याच जमीर (इ.स. १९७५)मध्ये त्यांनी त्याच सायराच्या वडिलांचे काम पत्करले. शम्मीने मनोरंजन (इ.स. १९७४) (इंग्रजी इर्मा ल दूस वर आधारित) आणि बंडलबाज़(इ.स. १९७६) चे दिग्दर्शन केले. 'मनोरंजन'मध्ये स्वतः चरित्र अभिनयही केला. पुढे इ.स. १९८० आणि इ.स. १९९० च्या दशकांत त्यांनी चरित्र-कलाकार म्हणून काम सुरू ठेवले आणि विधाता (इ.स. १९८२) मधील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट सहकलाकाराचा फिल्मफेअर पुरस्कार पटकावला. इ.स. १९९० आणि इ.स. २००० ह्या दशकांमधल्या कालावधीत हळूहळू त्यांनी चित्रपटांमधले काम कमी केले. इ.स. २००६ सालचा सँडविच हा त्यांचा अखेरचा प्रदर्शित चित्रपट होय.
 
शम्मी कपूरांचे नाव भारतातील इंटरनेट वापरणाऱ्या सुरुवातीच्या व्यक्तींमध्ये गणले जाते. ते इंटरनेट यूझर्स कम्युनिटी ऑफ इंडिया (आययूसीआय) - या संस्थेचे संस्थापक-चालक होते आणि एथिकल हॅकर्स असोशिएशन यांसारख्या इंटरनेट संस्थांमध्ये कार्यरत होते.
 
मूत्रपिंडांच्या विकारामुळे ७ ऑगस्ट, इ.स. २०११ रोजी शम्मी कपूरांस मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलात दाखल करण्यात आले. १४ ऑगस्ट, इ.स. २०११ रोजी पहाटे १५ वाजता त्यांचे निधन झाले.
 
सौजन्य : मराठी विकिपीडिया