Join us

ज्येष्ठ अभिनेत्री मा.सुलोचना दीदींचा वाढदिवस

By admin | Updated: July 30, 2016 11:16 IST

हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील श्रेष्ठ अभिनेत्री सुलोचना यांचा आज (३० जुलै) जन्मदिन.

संजीव वेलणकर
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३० -  हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील श्रेष्ठ अभिनेत्री सुलोचना यांचा आज जन्मदिन.  ३० जुलै १९२८ साली जन्मलेल्या सुलोचना यांनी १९४३ साली चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.  भालजी पेंढारकरांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. सन  त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटात चरित्र अभिनेत्री/ घरंदाज आई म्हणून काम केले. कै.भालजी पेंढारकर यांच्या दिग्दर्शनाच्या तालमीत तयार झालेल्या सुलोचनाबाईंची प्रतिमा लाखो चित्रपट रसिकांच्या मनात चित्रपटातील आई अशीच आहे. सोज्वळ, शांत आणि घरंदाज भूमिका त्यांनी पडद्यावर जिवंत केल्या. शेकडो मराठी आणि अनेक हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी अशा भूमिका केल्या. त्यांनी अन्य भूमिकाही केल्या आहेत. १९४३ ला हिंदी चित्रपट सृष्टीत सहकलाकार म्हणून पृथ्वीराज कपूर यांच्या बरोबर अभिनयाची सुरुवात करून पुढे राजकपूर, शम्मीकपूर, शशीकपूर या कपूर घराण्याच्या दुसऱ्या पिढीबरोबर आणि नंतर, कपूर घराण्याच्या तिसऱ्या पिढीच्या रणधीर कपूर, ऋषी कपूर, गीता बाली, बबिता, नीतू सिंग यांच्या बरोबरही त्यांनी हिंदी चित्रपटातील काळ गाजवला. २५० हून अधिक मराठी तसेच हिंदी चित्रपटांत त्यांनी आपल्या अभियानाची छाप पाडली. वहिनीच्या बांगड्या, मीठ भाकर, धाकटी जाऊ हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट आहेत.
लोकमत समुहा तर्फे मा.सुलोचना दीदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा.