Join us  

स्टार प्रवाहच्या लेक माझी लाडकीचे कलाकार बनले कूक, सेटवर तळले वडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2018 2:35 PM

लेक माझी लाडकी या मालिकेच्या टीमवर नुकतीच वडापाव पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीचे वैशिष्ट्य म्हणजे वडे या मालिकेच्या टीममधील सगळ्यांनी मिळून बनवले होते.

मालिकेच्या सेटवर तर सतत कामाचा व्याप असतो. स्टार प्रवाहच्या 'लेक माझी लाडकी' या मालिकेच्या सेटवर तर नेहमीच सगळे कामात व्यग्र असतात. पण त्यांना नुकताच एक छानसा ब्रेक मिळाला. या मालिकेच्या कलाकार-तंत्रज्ञांना वडापावची चमचमीत मेजवानी या मालिकेच्या सेटवरच मिळाली.स्टार प्रवाह या वाहिनीवर प्रक्षेपित होणाऱ्या मालिकांच्या सेटवर अगदी कौटुंबिक वातावरण असतं. त्यामुळे इथे नेहमीच धमाल मस्ती सुरू असते. या मालिकेची टीम म्हणजे एक कुटुंब असतं. कोणत्याही कुटुंबात जितक्या गंमतीजमती होतात, तशाच त्या मालिकांच्या सेटवरही होतात. नुकतीच लेक माझी लाडकी या मालिकेच्या सेटवर वडापावची मेजवानी झाली. मस्त रिमझिम पाऊस आणि गरमागरम वडापाव असा मस्त बेत जमून आला.अभिनेता अविनाश नारकर यांनी पुढाकार घेऊन ही वडापाव पार्टी जमवून आणली होती. ऐश्वर्या नारकर यांनी वडे करण्यासाठी मार्गदर्शन केलं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अविनाश नारकर यांच्यासह आशुतोष कुलकर्णी, सायली देवधर, विकास पाटील यांनीही वडे करण्यास हातभार लावला. त्यामुळे मालिकेच्या सेटवरच्या सगळ्यांनाच गरमागरम वडापावचा आस्वाद घेता आला. या पूर्वी ऐश्वर्या नारकर यांनी सेटवरच नारळाच्या वड्या देखील केल्या होत्या.या वडापावच्या बेताविषयी या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत असलेले अविनाश नारकर सांगतात, 'छान पाऊस पडत असताना आम्हाला सगळ्यांनाच वडापाव खाण्याची इच्छा झाली होती. वडापाव विकत आणण्यापेक्षा आपणच सेटवर करू असे मी ठरवले आणि वडे करण्याचा घाट घातला. बाकी सगळ्यांनीही माझी ही कल्पना उचलून धरली आणि उत्साहाने मदत केली. या वडापाव पार्टीमुळे सेटवर सगळेच खूश झाले होते. हे वडे खूपच टेस्टी झाले होते. आम्ही सगळ्यांनी मिळून या वड्यांवर ताव मारला.लेक माझी लाडकी या मालिकेच्या सेटवर गंमतीजमती होत असतानाच मालिकेच्या कथानकातही नवनवी वळणं येत आहेत. प्रेक्षकांना या मालिकेत येणारी ही वळणं नक्कीच आवडतील अशी लेक माझी लाडकी या मालिकेच्या टीमला खात्री आहे. 

टॅग्स :लेक माझी लाडकीअविनाश नारकरऐश्वर्या नारकर