ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १६ - 'उडान' या हिंदी मालिकेतील अभिनेते साई बलाल यांना सह अभिनेत्रीच्या लैंगिक शोषणाप्रकरणी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. साई बलाल यांच्यावर एका महिला अभिनेत्रीला अश्लील व्हिडीओ पाठवून तिचे शोषण केल्याचा आरोप आहे.
उडान मालिकेत कमल नारायण राजवंशी या खलनायकाची भूमिका करणारे साई बलाल यांच्याविरोधात एका अभिनेत्रीने बोरिवली पोलिस ठाण्यात लैंगिक शोषणाची तक्रार दाखल केली आहे. पिडीत अभिनेत्री ही उडान मालिकेत साई बलाल यांची सहअभिनेत्री होती व एप्रिलपासून साई बलाल हे तिच्याशी असभ्य वर्तन करत होते. साई बलाल पिडीत अभिनेत्रीला वॉट्स अॅपद्वारे अश्लील व्हिडीओ व मॅसेजस पाठवायचे. या कालावधीत त्यांनी अनेकदा पिडीत अभिनेत्रीचे शोषणही केले. यासंदर्भात पिडीत अभिनेत्रीने मालिकेच्या प्रॉडक्शन हाऊसकडे तक्रार नोंदवली. मात्र प्रॉडक्शन हाऊसने पिडीत अभिनेत्रीलाच मालिकेतून काढून टाकले. अखेरीस त्या अभिनेत्रीने सिने व टिव्ही आर्टिस्ट असोसिएशनकडे तक्रार नोंदवली. असोसिएशनने याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याची सुचना केली. यानुसार पिडीतेने बोरिवली पोलिस ठाण्यात साई बलाल यांच्याविरोधात तक्रार दाखल केली.