संजीव वेलणकर पुणे- हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत एक चमकदार गायक म्हणून नावलौकिक मिळवलेले सुरेश वाडकर यांचा आज म्हणजेच 7 ऑगस्ट 1954 जन्मदिवस. गायक सुरेश वाडकर यांनी वयाच्या आठव्या वर्षांपासून जियालाल वसंत यांच्याकडे संगीताचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. त्याप्रमाणेच पतियाळा घराण्याची तालीम घेतली. त्यांनी पार्श्वनाथ डिग्रजकर यांच्याकडून ही प्राथमिक गायनाचे शिक्षण आणि सदाशिव पवार यांच्याकडून तबल्याचे प्राथमिक शिक्षण घेतले. १९७६ साली सूर-सिंगार नावाच्या संगीत स्पर्धेत सुरेश वाडकरांनी भाग घेतला. त्यामधील स्पर्धकांची कामगिरी पारखायला हिंदी चित्रपटसृष्टीतील संगीतकार जयदेव इत्यादी नामवंत परीक्षक होते. सुरेश वाडकर या स्पर्धेत विजेते ठरले. त्यानंतर जयदेवांनी चाली बांधलेल्या गमन या हिंदी चित्रपटातील सीनेमें जलन हे गाणे वाडकर यांना गायला मिळाले. सुरेश वाडकर यांनी प्रामुख्याने मराठी आणि अनेक हिंदी चित्रपटांमधून पार्श्वगायन केले आहे. याखेरीज त्यांनी काही भोजपुरी, कोकणी, मल्याळी, गुजराती, बंगाली, सिंधी चित्रपटांतूनही आणि उर्दू भाषेतूनही गाणी गायली. प्रेमरोग, सदमा या चित्रपटातील त्यांची गाणी खूपच गाजली. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताची परंपरा टिकावी यासाठी सुरेश वाडकर यांनी आजीवासन गुरुकुलम नावाची संस्था सुरू केली. संगीत स्पर्धांमध्ये सुरेश वाडकर अनेकदा परीक्षक असतात. सुरेश वाडकर यांना त्यांच्या संगीतसेवेसाठी सुमारे ११ पुरस्कार मिळाले आहेत. मा.सुरेश वाडकर यांना आपल्या समूहातर्फे वाढदिवसाच्या शुभेच्छा.
सुरेश वाडकरांचा आज जन्मदिवस
By admin | Updated: August 7, 2016 15:41 IST