Join us  

सीमेवर जवान शहीद होतात अन् आपल्या देशात.., अदा शर्माच्या 'बस्तर'चा थरारक टीझर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2024 1:53 PM

'द केरळ स्टोरी' फेम अदा शर्माच्या आगामी 'बस्तर' सिनेमाचा टीझर रिलीज झालाय

२०२३ मध्ये रिलीज झालेल्या 'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) सिनेमाने सर्वांचं प्रेम मिळवलं. देशात घडणाऱ्या एका गंभीर विषयाला 'द केरळ स्टोरी' मध्ये दाखवण्यात आलं. या सिनेमाचं कौतुक झालंच शिवाय सिनेमात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अदा शर्माच्या (Adah Sharma) अभिनयालाही लोकांची पसंती मिळाली. आता अदा आगामी 'बस्तर' (Bastar Movie) सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'बस्तर'चा थरारक टीझर नुकताच रिलीज झालाय. टीझरमध्ये नक्षलवादाच्या विरोधात अदा आवाज उठवताना दिसतेय. 

'बस्तर' च्या टीझरमध्ये अदा शर्मा एका सरकारी कार्यालयात बसलेली दिसतेय. तिने काळ्या रंगाचा टीशर्ट परिधान केलेला असतो. तिच्यासमोर कॅमेरा असून ती तिचं म्हणणं मांडताना दिसते. "देशात नक्षलवाद्यांच्या आतंकी हल्ल्यात अनेक जवान शहीद होतात. पण त्यांची संख्या लपवली जाते. बस्तर सारख्या भागात ७६ जवान शहीद झाले. पण या गोष्टीचा JNU सारख्या देशाच्या प्रतिष्ठित विद्यापीठात आनंद साजरा केला जातोय. भारतातील काही सूडो इंटेलेक्चुअल्स पैशांसाठी देश तोडायला निघाली आहेत. माझी लढाई या सर्वांशी आहे", असं स्वगत अदा कॅमेरासमोर बोलताना दिसते.

अदा शर्मा 'बस्तर' मध्ये आयपीएस नीरजा माधवन ही भूमिका साकारताना दिसणार आहे. विपुल अमृतलाल शाह निर्मित 'बस्तर' चं दिग्दर्शन सुदिप्तो सेन करणार आहेत. सिनेमात अदा शर्मा प्रमुख भूमिकेत आहे. हा सिनेमा १५ मार्च २०२४ ला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. 'द केरळ स्टोरी' नंतर सामाजिक विषयावर भाष्य करणारा अदाचा हा नवीन सिनेमा पाहण्यास सर्वजण उत्सुक आहेत. 

टॅग्स :अदा शर्माबॉलिवूड