Join us

शिकायची तयारी पाहिजे

By admin | Updated: December 13, 2015 00:59 IST

नाटक असो, मालिका असो वा चित्रपट...तीनही क्षेत्रात तिने तिच्या अभिनयाची वेगळीच छाप पाडली आहे. अगदी कठीण, आव्हानात्मक भूमिकाही ती अगदी

नाटक असो, मालिका असो वा चित्रपट...तीनही क्षेत्रात तिने तिच्या अभिनयाची वेगळीच छाप पाडली आहे. अगदी कठीण, आव्हानात्मक भूमिकाही ती अगदी सहजपणे साकारते. तिच्या सौंदर्यावर तर सगळे भाळतातच; पण त्यापेक्षाही जास्त तिच्या अभिनयाने ती प्रेक्षकांना आपलंसं करते. सर्वांवर आपल्या अभिनयाने जादू करणारी अभिनेत्री म्हणजे, मुक्ता बर्वे. घर तिघांचं असावं या नाटकामधून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर तिने आम्हाला वेगळं व्हायचंय, देहभान, फायनल ड्राफ्ट, कबड्डी कबड्डी, तर आत्ता अगदी लव्ह बडर््स या नाटकापर्यंत तिचा रंगमंचावरील प्रवास सुरू आहे. ‘सीएनएक्स’ वाचकांशी सेलीब्रिटी रिपोर्टर म्हणून बोलतेय मुक्ता...शिकायची तयारी पाहिजे : अनेकदा खरा कलाकार हा रंगभूमीवरच तयार होतो, असं म्हटलं जातं. कारण, तिथं समोरच रसिक माय-बाप असतो आणि त्याच्याकडून त्याक्षणी कौतुकही केलं जातं आणि काही चुकलंच, तर ती चूकही दाखवून दिली जाते. इतकेच नाही, तर रंगभूमीवर खऱ्या अभिनयाची कसही लागते, असं म्हणतात आणि ते खरंच आहे. मी स्वत: रंगभूमीवर काम करते आणि माझी सुरुवातही तिथेच झाली. मुख्य म्हणजे, मला रंगभूमीवरच खूप काही शिकायला मिळालं. तांत्रिकदृष्ट्या बघायचं झालं, तर नाटक, मालिका आणि चित्रपट ही तीनही वेगळी माध्यमं आहेत. प्रत्येकच क्षेत्रात वेगवेगळ्या गोष्टी मला शिकायला मिळाल्या आहेत. आपण फक्त शिकायची तयारी ठेवली पाहिजे, असं मला वाटतं.एका क्षेत्रात काम केल्याचा दुसऱ्या क्षेत्रात निश्चितच फायदा होतो. तिथल्या तांत्रिक, अभिनयातील गोष्टींचा तर अनुभव आपल्या गाठीशी असतोच; पण त्याशिवाय आत्ता जर माझी मालिका सुरू असेल आणि त्याच वेळी जर माझं नाटकही सुरू असेल, तर मालिका पाहणारे तितक्याच ओढीने नाटकही पाहायला जातात. तितक्याच आतुरतेने चित्रपटाचीही वाट पाहतात. त्यामुळे या तीनही क्षेत्रातील काम एकमेकांना फायदाच करून देतं. मराठी चित्रपट आता आशय आणि विषयाच्या दोन्हीही बाबतीत खूपच पुढे गेला आहे. वेगवेगळे विषय मराठीमध्ये येत आहेत. माझ्या ‘डबलसीट’ चित्रपटाबाबतच सांगायचे, तर मुंबईतील जीवनावर अनेक हिंदी-मराठी चित्रपट आले होते; परंतु हा विषय अत्यंत वेगळ्या पद्धतीने मांडला गेला. प्रेक्षकांनीही त्याला चांगला प्रतिसाद दिला. केवळ मराठी भाषा असणाऱ्यांनीच नव्हे, तर इतर भाषिकांनाही या चित्रपटाची थीम आवडली. ‘जोगवा’बाबतही हेच सांगता येईल. हा विषय खूप वेगळा होता. तो राष्ट्रीय पातळीवर स्वीकारला गेला. चित्रपटाचा आशय चांगला असेल, तर तो भाषेच्या कक्षा ओलांडून पुढे जातो. हीच सध्याच्या मराठी चित्रपटाची ताकद आहे. प्रेक्षकांना आपलंसं वाटेल, तेच पाहतातसध्या ‘मुंबई-पुणे-मुंबई’सारखे मनोरंजन करणारे चित्रपट येत आहेत; पण त्याचबरोबर कोर्ट, फँड्री, किल्ला असे सामाजिक संदेश देणारे चित्रपटही येत आहेत; पण त्यामुळे प्रेक्षकवर्ग विभागला गेला आहे, असं मला वाटत नाही. कारण, आत्ताच्या प्रेक्षकांना सर्व प्रकारच्या धाटणीचे चित्रपट पाहायला आवडत आहेत. कारण, आपली इंडस्ट्री मुळातच छोटी आहे, त्यामुळे प्रेक्षकही कमी आहेत. त्यांना जे चांगलं आहे, त्यांना आपलंस वाटेल, असे चित्रपट बघायला आवडतात, असा माझा अनुभव आहे. अजून थोडे प्रयत्न करायला हवेइतकी वर्षं मराठी चित्रपट पुणे-मुंबईपर्यंतच मर्यादित राहात; पण आता हळूहळू ही परिस्थिती बदलत आहे. नाशिक, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र या भागातही मराठी चित्रपट आता पोहोचू लागला आहे. अजून थोडे प्रयत्न केले, तर संपूर्ण महाराष्ट्रात मराठी चित्रपट नक्कीच पोहोचू शकेल.

- Celebrity Reporter : Mukta Barve