छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान आणि शौर्यगाथेवर आधारित असलेला छावा सिनेमा अलिकडेच प्रदर्शित झाला आहे. सर्वत्र छावा सिनेमाची चर्चा सुरू असतानाच आता छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील सिनेमाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच 'द प्राइड ऑफ भारत : छत्रपती शिवाजी महाराज' या सिनेमाची घोषणा करण्यात आली होती. आता या सिनेमाचं नवीन पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे.
आज शिवजयंती निमित्ताने 'द प्राइड ऑफ भारत : छत्रपती शिवाजी महाराज' सिनेमाचं नवं पोस्टर प्रदर्शित करण्याबरोबरच सिनेमाची रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे. भवानी मातेची भव्य मूर्ती आणि समोर उभे असलेले छत्रपती शिवाजी महाराज...असं या पोस्टरवर दिसत आहे. या पोस्टरने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 'द प्राइड ऑफ भारत : छत्रपती शिवाजी महाराज' सिनेमाच्या पोस्टरने चाहत्यांची चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढवली आहे. पण, या सिनेमासाठी चाहत्यांनी काही वर्ष वाट पाहावी लागणार आहे.
'द प्राइड ऑफ भारत : छत्रपती शिवाजी महाराज' हा बॉलिवूड सिनेमा आहे. पण, हा सिनेमा २०२७ मध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. २१ जानेवारी २०२७ रोजी सिनेमा थिएटरमध्ये रिलीज करण्यात येणार आहे. या सिनेमात कांतारा फेम ऋषभ शेट्टी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. संदीप सिंग यांनी छत्रपती शिवाजी महाराज या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.