Join us  

स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेच्या फॅन्ससाठी ही खुशखबर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 3:55 PM

'स्वराज्य रक्षक संभाजी' या मालिकेने लोकप्रियतेचे शिखर गाठलंय. मालिकेतील प्रत्येक पात्र संभाजी महाराजांचा इतिहास प्रेक्षकांच्या डोळ्यांपुढं उभा करण्यात यशस्वी झालंय.

ठळक मुद्दे‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेचा ५०० वा भाग शनिवारी प्रसारित झाला. संपूर्ण मालिकेच्या टीमचा फोटो शेअर करत दिग्दर्शकांनी रसिक प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.

ऐतिहासिक कथा आणि कलाकारांच्या दमदार अभिनयामुळं छोट्या पडद्यावरील झी मराठी वाहिनीच्या 'स्वराज्य रक्षक संभाजी' या मालिकेने लोकप्रियतेचे शिखर गाठलंय. मालिकेतील प्रत्येक पात्र संभाजी महाराजांचा इतिहास प्रेक्षकांच्या डोळ्यांपुढं उभा करण्यात यशस्वी झालंय. या मालिकेची कथा, या मालिकेतील प्रत्येक कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांना भावत आहे.

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून घेतलं. आता या मालिकेने तब्बल ५०० भागांचा टप्पा पूर्ण केला आहे. मालिकेचे दिग्दर्शक कार्तिक केंढे यांनी फेसबुकवर संपूर्ण टीमचा फोटो शेअर करत ही गोष्ट या मालिकेच्या चाहत्यांना सांगितली.

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेचा ५०० वा भाग शनिवारी प्रसारित झाला. संपूर्ण मालिकेच्या टीमचा फोटो शेअर करत दिग्दर्शकांनी रसिक प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. मालिकेत संभाजी महाराजांच्या भूमिकेसाठी डॉ. अमोल कोल्हेंनी शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक या तिन्ही स्तरांवर विशेष मेहनत घेतली आहे. मालिका सुरू होण्यापूर्वी त्यांनी या तयारीबद्दल सांगितलं देखील होतं. शारीरिक स्तरावर मी भारदस्त छाती, धिप्पाड शरीर यासाठी बराच काळ मेहनत घेतली आणि अजूनही घेत असल्याचे त्याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत देखील सांगितले होते. बौद्धिक स्तरावर मेहनत घेताना मी ज्यांनी ज्यांनी संभाजी महाराजांवर पुस्तकं लिहिली आहेत, ती पुस्तकं तसेच ज्यांनी ज्यांनी संभाजी महाराजांवर प्रबंध लिहिले आहेत तेही वाचले. प्रत्येकाचं महाराजांवरचं लिखाण, त्यांचा महाराजांकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे वेगळा होता. तो दृष्टिकोन मी समजून घेतला. आपली मालिका ही इतिहासाच्या एकेकाळच्या सुवर्णकाळाचे प्रतिनिधित्व करणारी आहे. त्यामुळे इतिहासाला कुठेही गालबोट न लागता ही मालिका प्रेक्षकांसमोर सादर करणं आणि आजच्या तरुणाईला संभाजींची ओळख करून देणं याचं भान ठेवत ही मालिका केली असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.

झी मराठीवरील 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेमध्ये डॉ. अमोल कोल्हे यांनी संभाजीराजांच्या भूमिकेतून आपली जबरदस्त छाप पाडली असून या मालिकेमुळे त्यांच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली आहे.

टॅग्स :स्वराज्य रक्षक संभाजीडॉ अमोल कोल्हे