Join us

जगप्रसिद्ध जादूगर सुहानी शाह मुंबई दौर्‍यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2017 10:15 IST

वयाच्या ७ व्या वर्षापासून आपल्या जादूची किमया दाखवून प्रेक्षकांना मोहित करणारी २३ वर्षाची जगप्रसिद्ध तरुण जादूगर सुहानी शाह मुंबईच्या ...

वयाच्या ७ व्या वर्षापासून आपल्या जादूची किमया दाखवून प्रेक्षकांना मोहित करणारी २३ वर्षाची जगप्रसिद्ध तरुण जादूगर सुहानी शाह मुंबईच्या दौर्‍यावर येत आहे. बिगबीबुल्स एंटरटेनमेंट प्रस्तुत, अष्टविनायक निर्मित “स्टँड – अप मॅजिक” हया जादूगर सुहानी शाहच्या अनोख्या जादूचे प्रयोग नवी मुंबई, ठाणे आणि मुंबईत होणार आहेत. हया वर्षाच्या शेवटच्या आठवडयात म्हणजेच दि. २४ डिसेंबर ते ३० डिसेंबर हया दरम्यान सलग सात दिवसात १० प्रयोग होणार आहेत. 

मॅजिक आवडत नाही अशी व्यक्ती शोधून सापडणे अवघड आहे. जादूचे प्रयोग लहान थोरांपासून सर्व थरातील व्यक्तींना आवडतात. अशातच जगप्रसिद्ध जादूगर सुहानी शाह यांचा मॅजिक शो पाहण्याचा दुर्मिळ योग मुंबईकरांना या शोच्या निमित्ताने चालून आला आहे. टीव्ही मालिका, नाटक, चित्रपट हया माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन होत असले तरी यापेक्षा काहीतरी वेगळे आयोजन करावे हया उद्देश्याने आयोजक विकास भामरे व संतोष वाजे यांनी हया आगळया वेगळ्या मॅजिक शो चे आयोजन केले आहे.

जादूगर सुहानी शाह यांचा “स्टँड - अप मॅजिक” शो हा लोकप्रिय जादुई प्रयोग आहे. अदभूत मोहजालासह मानसिक कलाव्हिज्युअल इफेक्ट, पट्टीने डोळे बांधून केलेले सादरीकरणप्रेक्षकांचा सहभागपरिस्थितीनुरूप कॉमेडी या तिच्या प्रयोगांमुळे प्रेक्षक स्वतः ला विसरून जातात. सुहानी हिच्या १८० मिनिटांच्या जादूच्या शोचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे एखाद्याच्या / एखादीच्या मनात काय चालले आहे किंवा त्याच्या किंवा तिच्या भूतकाळातील गुपिते उलगडणे. मात्र या गोष्टी किंवा गुपिते सुहानी नव्हे तर उपस्थित प्रेक्षकांतर्फे उलगडली जाणार आहेत. सुहानी शाह हिचा हा प्रयोग पाहून भल्याभल्यांची तारांबळ उडाली आहे. असा हा आगळावेगळा शो पाहण्याची आणि अनुभवण्याची संधी मुंबई, नवी मुंबई आणि ठाणेकरांना उपलब्ध झाली आहे. व्यावसायिक हिप्नोथेरपिस्ट असलेल्या सुहानी शाह हिने गेल्या १७ वर्षांमध्ये भारतासह परदेशातही शो केले आहेत. तिच्या कामगिरीची दखल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही घेण्यात आलेली आहे.