'सन मराठी' वाहिनीवरील नवी मालिका म्हणजेच 'जुळली गाठ गं' प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात यशस्वी ठरली आहे. लग्न झाल्यावर महिलांना योग्य तो मान व त्यांच्या स्वप्नांना बळ मिळावं हेच या मालिकेतून दाखवलं जात आहे. मालिकेचं शूटिंग हे कोल्हापूरमध्ये सुरु असल्याने कलाकारांना आपल्या कुटुंबापासून दूर रहावे लागत आहे. मालिकेत दामिनी मुजुमदार हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री सुरेखा कुडची या खऱ्या आयुष्यात सिंगल मदर म्हणून त्यांच्या मुलीचा सांभाळ करतात.
याबद्दल अभिनेत्री सुरेखा कुडची म्हणाल्या की, "मालिकेतही सिंगल मदर व खऱ्या आयुष्यातही सिंगल मदर म्हणून जगत आहे. त्यामुळे ही भूमिका मला प्रचंड भावते. माझी मुलगी दहावीला आहे. पण कामामुळे कधीच तिला खूप वेळ देता येत नाही. ती साडे तीन वर्षांची होती तेव्हा माझ्या नवऱ्याला देवाज्ञा झाली. तेव्हापासून ते आतापर्यंत मुलीचा सांभाळ एकटीनेच केला आहे. माझ्या आई बाबांनी मला पाठिंबा दिला नसता तर इथवर येणं शक्य नव्हतं. मुलीच्या बालपणातही मला तिच्याबरोबर जास्त राहता आलं नाही. मला टेलिव्हिजनवर पाहूनच ती मोठी होत गेली. "
त्या पुढे म्हणाल्या की, "मी मुलीबरोबर नसताना आई बाबांनी तिच्यावर चांगले संस्कार केले. मुलगी म्हणून तिने मला खूप सांभाळून घेतलं आहे, तिचं माझं जग आहे. कामामुळे महिन्यातील २५ दिवस तरी मी बाहेर असते त्यामुळे जेव्हाही मी तिला भेटते तेव्हा तिला बिलगून असते, हाताने जेवण भरवते, तिचे सगळे लाड पुरवते. खरंच बऱ्याच महिला सिंगल मदर म्हणून आपल्या मुलांचं संगोपन करत असतात आणि हा काळ खूप जबाबदारीचा असतो. या काळात आपल्या कुटुंबाचा, नातेवाईकांचा सपोर्ट असणं खूप महत्त्वाचं आहे. मी याबाबतीत मला खूप नशीबवान समजते. 'जुळली गाठ गं' या मालिकेत खलनायिकेची भूमिका जरी साकारत आहे तरी आईला आपला मुलगा प्रिय असतो. तसंच दामिनीला धैर्य प्रिय आहे त्यामुळे त्याच्याकडे मुजुमदारांचं साम्राज्य असावं यासाठी दामिनी प्रयत्न करताना दिसते. मालिकेचा विषय खूप छान आहे. प्रेक्षकांनीही मालिकेला पसंती दर्शवली म्हणून आमच्या टीमला काम करण्याची ऊर्जा मिळते. म्हणूनच सर्व प्रेक्षकांनी सोम. ते रवि. ८.३० वाजता आमची मालिका जरूर पाहा. "