Join us  

'साराभाई व्हर्सेस साराभाई' चा तिसरा सीझन येणार? अनुपमा संपल्यानंतर...वाचा काय म्हणाले मेकर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2024 5:35 PM

'साराभाई व्हर्सेस साराभाई' ने कायम प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे.

टेलिव्हिजनवरील लोकप्रिय विनोदी मालिका 'साराभाई व्हर्सेस साराभाई' (Sarabhai VS Sarabhai) ने प्रेक्षकांना खळखळून हसवलं. मोनिशा, साहिल, माया, इंद्रवर्धन आणि रोसेश अशा सर्वच पात्रांनी धमाल आणली. २००४ साली याचा पहिला सीझन आला तर १३ वर्षांनी म्हणजेच २०१७ साली याचा दुसरा सिझन हॉटस्टारवर प्रदर्शित झाला. आता 'साराभाई व्हर्सेस साराभाई 3' ही येणार का याची हिंट मेकर्सने दिली आहे. 

'साराभाई व्हर्सेस साराभाई' मध्ये अभिनेत्री रत्ना पाठक शाह यांनी माया साराभाईची भूमिका साकारली तर रुपाली गांगुलीने मोलिशा हे पात्र साकारले. माया सासू तर मोनिशा त्यांची सून होती. सासू सूनेची नोकझोक प्रेक्षकांना भरपूर हसवायची. माया साराभाई ती किती श्रीमंत, हायफाय आहे हे दाखवत असते. तर मोनिशा मध्यमवर्गीय कुटुंबातली असल्यासारखं राहायची. या दोघींमध्ये मायाचा मुलगा साहील म्हणजेच सुमित राघवन फसायचा. सतीश शाह हे मायाच्या पतीच्या भूमिकेत होते तर राजेश कुमार म्हणजेच रोसेश हा दुसऱ्या मुलाच्या भूमिकेत होता.  अतिशय धमाल अशी ही फॅमिली होती. हे कुटुंब परत कधी भेटीला येणार आणि हसवणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. याबाबत निर्माते जेडी मजेठिया म्हणाले, "साराभाई व्हर्सेस साराभाई ३ आणायचं माझ्याही डोक्यात आहे.पण त्यासाठी खूप चांगली स्क्रीप्ट हवी. एकदम तगडा फॅक्टर पाहिजे. जर तुम्ही अशीच प्रार्थना करत राहिलात तर नक्कीच काही ना काही होईल आणि साराभाई चा तिसरा सिझन बनेल."

जेठी मजेठिया यांनी 'खिचडी' सिनेमा फ्लॉप होण्यावरही मौन सोडले. ते म्हणाले, "आम्ही सिनेमाची चुकीची रिलीज डेट निवडली. तेव्हा वर्ल्ड कप फायनल होतं. कोणत्याही छोट्या बजेट सिनेमासाठी रविवारचा दिवस खूप महत्वाचा असतो. पण आमच्यासाठी रविवार सपशेल फेल ठरला. तसंच सिनेमा पायरसीचा शिकार झाला. माझ्या अनेक नातेवाईकांनी मला फोन केला आणि सांगितले की त्यांनी घरीच सिनेमा पाहिला. पायरसीने खिचडीला संपवलं. तसंच सिनेमाच्या रिलीजनंतर दोन आठवड्यात अॅनिमल रिलीज झाला."

सध्या मोलिशा म्हणजेच अभिनेत्री रुपाली गांगुली लोकप्रिय 'अनुपमा' मालिकेत व्यस्त आहे. ही मालिका टेलिव्हिजनवर एक नंबरची मालिका बनली आहे. त्यामुळे अनुपमा संपल्यानंतरच रुपाली साराभाई साठी वेळ देऊ शकणार आहे.

टॅग्स :टिव्ही कलाकारटेलिव्हिजनसुमीत राघवनसतिश शहा