Join us  

या कारणाने स्वीकारली छवी पांडेने लेडीज स्पेशल ही मालिका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2018 4:16 PM

छवी पांडेची नेहेमीच एक इच्छा होती की, तिने टेलिव्हिजनवर वेगवेगळ्या भूमिका साकाराव्यात आणि तिला 'लेडीज स्पेशल'च्या रूपाने ही संधी मिळाली.

ठळक मुद्देमहिला त्यांच्या आयुष्यातील कोणत्याही प्रसंगाला आपल्या मूळ स्वभावाने आणि 'नेव्हर से डाय' अशा प्रवृत्तीमुळे कशा सामोऱ्या जातात ते या कार्यक्रमात दाखवलं आहे. मी साकारत असलेल्या प्रार्थना या मुलीसाठी, तिच्या कुटुंबाची ख्यालीखुशाली आणि आनंद एवढंच तिचं विश्व आहे. तिच्या स्वभावात अनेक छटा आहेत आणि वयाच्या मानाने ती खूपच प्रगल्भ आहे त्यामुळे या मालिकेत मी काम करण्याचे ठरवले असे छवी सांगते.

एखादा कलाकार कोणत्याही कार्यक्रमाची किंवा भूमिकेची निवड करताना त्याच्या विविध पैलूंचा विचार करतो. त्याचप्रमाणे सोनी एन्टरटेनमेंट टेलिव्हिजनवर लवकरच प्रसारित होणाऱ्या 'लेडीज स्पेशल' या कार्यक्रमात प्रार्थना कश्यपची भूमिका निवडताना, प्रख्यात अभिनेत्री छवी पांडेचीही स्वतःची काही कारणं होती. या गुणवान अभिनेत्रीच्या मते, वास्तविक आणि डि-ग्लॅम भूमिकेमुळे तिने ही भूमिका निवडली.

छवी पांडेची नेहेमीच एक इच्छा होती की, तिने टेलिव्हिजनवर वेगवेगळ्या भूमिका साकाराव्यात आणि तिला 'लेडीज स्पेशल'च्या रूपाने ही संधी मिळाली. प्रार्थना कश्यपची पडद्यावरची भूमिका एका कष्टाळू, व्यावहारिक आणि निःस्वार्थी मुलीची आहे, जी आपल्या कुटुंबाची एकमेव कमावती व्यक्ती आहे. ती खूपच प्रामाणिक आणि बेधडकपणाने बोलणारी आहे आणि तिने तिच्या कुटुंबाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतलेली आहे. याबद्दल बोलताना छवी सांगते, "'लेडीज स्पेशल' अशा रोचक कार्यक्रमामध्ये माझा सहभाग असल्यामुळे मला अतिशय आनंद झाला आहे. महिला त्यांच्या आयुष्यातील कोणत्याही प्रसंगाला आपल्या मूळ स्वभावाने आणि 'नेव्हर से डाय' अशा प्रवृत्तीमुळे कशा सामोऱ्या जातात ते या कार्यक्रमात दाखवलं आहे. मी साकारत असलेल्या प्रार्थना या मुलीसाठी, तिच्या कुटुंबाची ख्यालीखुशाली आणि आनंद एवढंच तिचं विश्व आहे. तिच्या स्वभावात अनेक छटा आहेत आणि वयाच्या मानाने ती खूपच प्रगल्भ आहे."

'समाजातील तीन अतिशय वेगळ्या सामाजिक आणि आर्थिक स्तरांमधून येणाऱ्या आणि एकदम वेगवेगळे स्वभाव असणाऱ्या तीन स्त्रिया, लेडीज स्पेशल' ट्रेनमध्ये भेटतात आणि त्यांच्यात असा बंध तयार होतो की त्यांचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून जातो असं चित्रण या मालिकेत करण्यात आलं आहे. 'लेडीज स्पेशल'मध्ये वास्तविक भूमिका आणि सहजपणे संबंध जुळतील अशा आयुष्यातील संघर्षाच्या गोष्टी यामुळे महिलांच्या आयुष्यातील इच्छा-आकांक्षा आणि मैत्री दाखवण्यात आली आहे.

'लेडीज स्पेशल' या मालिकेत महाराष्ट्र, गुजरात आणि उत्तर प्रदेशातील तीन महिलांच्या आयुष्यात येणारे चढउतार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. गिरीजा ओक, बिजल जोशी यांच्या या मालिकेत मुख्य भूमिका आहेत. 

टॅग्स :लेडीज स्पेशल