Join us  

सोनाक्षी सिन्हा सांगते, माझ्या वडिलांनी सांगितलेली ती गोष्ट ऐकून मला झाला होता आनंद

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2019 5:13 PM

सोनाक्षी देखील तिचे वडील अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची खूप लाडकी आहे. मुलगी आणि वडिलांचे नातेच खूप वेगळे असते असे या कार्यक्रमात वडील-मुलीच्या नात्यावर भाष्य करताना सोनाक्षी म्हणाली.

ठळक मुद्देविमानातून येत असताना एका हवाई सुंदरीने माझ्या वडिलांना येऊन विचारले की, ‘तुम्ही सोनाक्षीचे वडील आहात का?’ हे सांगताना मला माझ्या वडिलांच्या डोळ्यांत अभिमानाची भावना दिसत होती.”

कलंक चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सध्या या चित्रपटाची टीम करत आहेत. या चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेले आलिया भट्ट, वरुण धवन आणि सोनाक्षी सिन्हा यांनी नुकतीच सुपर डान्सर ३ या कार्यक्रमाच्या सेटला भेट दिली. या कार्यक्रमाच्या शादी स्पेशल भागात ते उपस्थित राहिले होते. या कार्यक्रमातील सगळ्याच चिमुकल्यांचा परफॉर्मन्स या सगळ्यांना आवडला. त्यांनी या चिमुरड्यांचे भरभरून कौतुक केले. त्यांच्या खोड्या पाहून या कलाकारांना आपले बालपण आठवले होते. 

सिलिगुडीच्या अवस्था थापा आणि तिचा सुपर गुरू आर्यन पात्रा यांचा परफॉर्मन्स तर प्रेक्षकांना प्रचंड आवडला. या परफॉर्मन्सनंतर सोनाक्षीला गप्पांमधून कळाले की, अवस्थाचे वडील आर्मीत असल्यामुळे तिला आपल्या वडिलांची खूप आठवण येते. सोनाक्षी देखील तिचे वडील अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची खूप लाडकी आहे. मुलगी आणि वडिलांचे नातेच खूप वेगळे असते असे या कार्यक्रमात वडील-मुलीच्या नात्यावर भाष्य करताना सोनाक्षी म्हणाली. तिने सांगितले, “मुली आपल्या वडिलांच्या जास्त जवळ असतात. मुलींच्या समोर त्यांचे वडील सहसा फार वाद घालत नाहीत. मला खात्री आहे की, अवस्था तिच्या वडिलांची लाडकीच असणारच. किंबहुना अवस्था, तू, मी, सर्वच मुली ज्या आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करतात, त्या नशीबवान म्हटल्या पाहिजेत... कारण त्यांना फक्त आईचा आधारच मिळत नाही तर वडिलांकडून देखील प्रोत्साहन मिळते. ते आपल्याला काहीही करण्यापासून रोखत नाहीत. जगात अशा खूप मुली आहेत ज्यांना आपले स्वप्न साकार साकारण्यापासून अडवले जाते, पण आपण खूप नशीबवान आहोत, कारण आपल्या पाठीशी आपले वडील आहेत. मला नेहमी माझ्या भावांच्या बरोबरीने वागवले गेले. मी खूप नशीबवान आहे. मला आशा आहे की, एक दिवस सर्व मुलींची अशीच भावना असेल. 

सोनाक्षी सिन्हाने एक खूप खास आठवण यावेळी सांगितली. ती म्हणाली, “मी शाळेत असताना सर्वजण मला शत्रुघ्न सिन्हाची मुलगी म्हणून ओळखत असत. पण एक दिवस माझे वडील घरी आले तेव्हा ते खूप आश्चर्यचकित झालेले होते. मी त्यांना विचारले असता ते म्हणाले की, ते विमानातून  येत असताना एका हवाई सुंदरीने त्यांच्यापाशी येऊन त्यांना विचारले की, ‘तुम्ही सोनाक्षीचे वडील आहात का?’ हे सांगताना मला माझ्या वडिलांच्या डोळ्यांत अभिमानाची भावना दिसत होती.”

टॅग्स :सुपर डान्सरसोनाक्षी सिन्हाकलंक