Join us

जय भानुशाली बनणार ​द व्हॉइस इंडिया किड्सचा होस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2017 11:47 IST

द व्हॉइस इंडिया किड्सच्या या कार्यक्रमाचा पहिला सिझन प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला होता. या सिझनमधील सगळ्याच चिमुरड्यांचा आवाज प्रेक्षकांना ...

द व्हॉइस इंडिया किड्सच्या या कार्यक्रमाचा पहिला सिझन प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला होता. या सिझनमधील सगळ्याच चिमुरड्यांचा आवाज प्रेक्षकांना खूपच आवडला होता. आता या कार्यक्रमाचा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या सिझनची सध्या जय्यत तयारी सुरू आहे. पहिल्या सिझनमध्ये आपल्याला जय भानुशाली होस्टच्या भूमिकेत पाहायला मिळाला होता. या सिझनमध्ये देखील जय भानुशालीच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहे.द व्हॉइस इंडिया किड्स या कार्यक्रमासाठी देशभर सध्या ऑडिशन सुरू असून ऑडिशनमधून सर्वोत्तम गायकांची निवड करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून यंदाचा सिझनही गेल्या सिझनप्रमाणे प्रेक्षकांना आवडेल अशी या कार्यक्रमाच्या निर्मात्यांना खात्री आहे. द व्हॉइस इंडिया किड्सच्या पहिल्या सिझनमध्ये जय भानुशालीला सुगंधा मिश्राची साथ लाभली होती. पण या सिझनमध्ये आता प्रेक्षकांना सुगंधाला पाहाता येणार नाहीये. यंदाच्या सिझनमध्ये प्रसिद्ध बालकलावंत निहार गिते जयसोबत सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. बडे मियाँ आणि छोटे मियाँची ही जोडी प्रेक्षकांना आवडेल अशी या कार्यक्रमाच्या टीमला खात्री आहे.डान्स इंडिया डान्स, डान्स के सुपरकिड्स यांसारख्या कार्यक्रमात देखील जय भानुशालीने सूत्रसंचालकाची भूमिका साकारली होती. त्याने धूम मचाओ धूम या मालिकेद्वारे त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर कयामत या मालिकेत तो दिसला. या मालिकेसाठी त्याला अनेक पुरस्कार देखील मिळाले. त्याने झलक दिखला जा, इस जंगल से मुझे बचाओ, नच बलिये, खतरों के खिलाडी यांसारख्या रिअॅलिटी शो मध्ये भाग घेतला आहे. तसेच हेट स्टोरी २, देसी कट्टे, एक पहेली लीला यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने मुख्य भूमिका साकारल्या आहेत. द व्हॉइस इंडिया किड्स या कार्यक्रमात नीती मोहन, शान आणि शेखर रावजियानी यांनी परीक्षकाची भूमिका बजावली होती. या सिझनमध्ये आता परीक्षकाच्या खुर्चीत कोण बसणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. उत्तर प्रदेशची निष्ठा शर्मा द व्हॉइस इंडिया किड्स या कार्यक्रमाच्या पहिल्या सिझनची विजेती ठरली होती. निष्ठा नीती मोहनच्या टीममधील होती. Also Read : फॅमिलीसह हॉलिडे एन्जॉय करतेय माही विज