कॉमेडीची बुलेट ट्रेनमध्ये रंगली विवेक ऑबेरॉय आणि रितेश देशमुख यांच्या विनोदाची जुगलबंदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2017 14:50 IST
कॉमेडीची बुलेट ट्रेन मधील सगळेच कलाकार एकापेक्षा एक सरस असून त्यांनी आपल्या विनोदशैलीने प्रेक्षकांना पोट धरून हसण्यास भाग पाडले ...
कॉमेडीची बुलेट ट्रेनमध्ये रंगली विवेक ऑबेरॉय आणि रितेश देशमुख यांच्या विनोदाची जुगलबंदी
कॉमेडीची बुलेट ट्रेन मधील सगळेच कलाकार एकापेक्षा एक सरस असून त्यांनी आपल्या विनोदशैलीने प्रेक्षकांना पोट धरून हसण्यास भाग पाडले आहे. या कार्यक्रमातील विनोदवीरांनी प्रेक्षकांची मने चांगलीच जिंकली आहेत. या कार्यक्रमाच्या मंचावर नुकतीच अभिनेते विवेक ऑबेरॉय आणि रितेश देशमुख यांनी हजेरी लावली होती. हे दोघेही आपल्या बँकचोर या नवीन चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या कार्यक्रमात आले होते. या कार्यक्रमाच्या सेटवर विवेक ऑबेरॉय आणि रितेश देशमुख यांच्या विनोदाची जुगलबंदी रंगली होती. कॉमेडीची बुलेट ट्रेनच्या मंचावर हे दोघे पहिल्यांदाच आले होते. विवेक आणि रितेश यांनी उपस्थिती लावून विनोदवीरांबरोबर बरीच धमाल मस्ती केली. रितेशने स्कीटच्या दरम्यान प्रेक्षकांना आणि स्पर्धकांना आदर्श नवरा बनण्याचे धडे दिले. तसेच विवेक ऑबेरॉयने स्कीट संपल्यावर मराठी भाषेत प्रतिक्रिया दिल्या. नादखुळा, आईच्या गावात, बाराच्या भावात आणि लढबापू यांसारखे मराठमोळे शब्द तो बोलताना या कार्यक्रमात दिसला. विनोदवीरांनी सादर केलेले स्कीटस देखील या दोघांना खूपच आवडले. नम्रता आवटे, रोहित पवार आणि योगेश शिरसाट यांनी सादर केलेले स्कीट तर त्यांना विशेष आवडले. विवेकने तर नम्रता आणि रोहितचे स्कीट बघून मला चार्ली चॅप्लीन आठवला असे देखील म्हटले. सोनाली कुलकर्णी या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका बजावते. विवेक ऑबेरॉय आणि तिने एका चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान तो सोनालीला वाकड अशी हाक मारायचा. सोनाली मुळची पुण्यामधील वाकड येथील असल्याकारणाने तिला त्याने हे नाव दिले होते. या व्यतिरिक्त रितेश आणि विवेकने आपण करत असलेल्या सामाजिक कार्याबद्दलदेखील या कार्यक्रमात माहिती दिली.