विक्रम भट्ट दिल संभल जा जरा या मालिकेद्वारे वळले छोट्या पडद्यावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2017 10:21 IST
बॉलिवूड दिग्दर्शक-निर्माते विक्रम भट्ट दिल संभल जा जरा या मालिकेद्वारे छोट्या पडद्याकडे वळले आहेत. विक्रम यांनी आजवर अनेक हिट ...
विक्रम भट्ट दिल संभल जा जरा या मालिकेद्वारे वळले छोट्या पडद्यावर
बॉलिवूड दिग्दर्शक-निर्माते विक्रम भट्ट दिल संभल जा जरा या मालिकेद्वारे छोट्या पडद्याकडे वळले आहेत. विक्रम यांनी आजवर अनेक हिट चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन केले आहे. त्यामुळे त्यांची ही मालिका देखील थोडीशी हटके असणार आहे. या मालिकेत प्रेक्षकांना अहाना आणि अनंत माथुर यांची कथा पाहायला मिळणार आहे. अहाना आणि अनंत यांचे लग्न झालेले असून अनंत नेहमीच आपल्या कुटुंबाला पहिले प्राधान्य देतो. त्याचे आपल्या कुटुंबियांवर खूप प्रेम आहे. तो अहानाची प्रचंड काळजी घेतो. पण त्यांच्या या नात्यामध्ये एक अबोल सत्य आहे, ज्यामुळे अनंत अहानासाठी योग्य ठरत नाही आणि त्यामुळे त्यांचे नाते धोक्यात येऊ शकते. लग्न ही अहानाची सर्वांत मोठी चूक का आहे हे प्रेक्षकांना दिल संभल जा जरा या मालिकेत पाहायला मिळणार आहे.अहाना एक आधुनिक, स्वतंत्र विचारांची मुलगी असून तिने आपल्या आईवडिलांचे लग्न मोडताना पाहिले आहे. आज तिचा लग्नव्यवस्थेवर विश्वास आहे आणि आपल्या पतीसोबतचे आपले नाते टिकावे यासाठी काहीही करण्याची तिची तयारी आहे. आपल्या आईवडिलांमधील तणाव पाहत मोठी झालेली अहाना अतिशय सतर्क आणि आपल्या भावनांबद्दल सकारात्मक बनली आहे. लग्न नक्की कशामुळे टिकते? या प्रश्नाचे उत्तर ती शोधण्याचा प्रयत्न करतेय. या शोच्या संकल्पनेबाबत विक्रम भट्ट सांगतात, “छोट्या पडद्यावरील आजवरच्या मालिकांपेक्षा ही एक वेगळी मालिका आहे. ही एक वेगळ्या धाटणीची आणि परिपक्व प्रेमकथा आहे. या शोमधील कॉन्टेन्ट अॅडल्ट नसला तरी या मालिकेचा विषय हा अतिशय बोल्ड आहे. अहानाचे लग्न ही तिची चूक कशी आहे हे जाणून घेऊन प्रेक्षक नक्कीच आश्चर्यचकित होतील आणि तिच्या आयुष्यातील कोडे त्यांनाही आपलेसे वाटेल.”दिल संभल जा जरा ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या मालिकेत निकी अनेजा वालिया, संजय कपूर, स्मृती कालरा आणि अशिम गुलाटी यांच्या मुख्य भूमिका आहेत. ही मालिका स्टार प्लस वाहिनीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. Also Read : संजय कपूर करतोय तब्बल १३ वर्षांनी कमबॅक