बेहद फेम जेनिफर विंगेटने करण सिंग ग्रोव्हरसोबतच्या घटस्फोटाबाबत पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2017 10:43 IST
जेनिफर विंगेट सध्या बेहद या मालिकेत माया ही भूमिका साकारत आहे. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. ...
बेहद फेम जेनिफर विंगेटने करण सिंग ग्रोव्हरसोबतच्या घटस्फोटाबाबत पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया
जेनिफर विंगेट सध्या बेहद या मालिकेत माया ही भूमिका साकारत आहे. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. तिचे वैयक्तिक आयुष्य हे नेहमीच मीडियात चर्चेचा विषय बनले आहे. दिल मिल गये या मालिकेच्या सेटवर तिची करण सिंग ग्रोव्हरशी ओळख झाली होती. या मालिकेच्या चित्राकरणादरम्यान ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि या मालिकेनंतर काहीच महिन्यात त्यांनी लग्न केले. करणचे जेनिफरच्या आधी श्रद्धा निगमसोबत लग्न झाले होते. जेनिफरसोबत लग्न केल्यानंतर काहीच महिन्यात करणने जेनिफरलादेखील घटस्फोट दिला. जेनिफरच्या आयुष्यात आलेल्या या वादळातून तिने आता स्वतःला सावरले आहे. नुकत्याच एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत तिने म्हटले आहे की, माझ्या आयुष्यात घडलेल्या घटनेमुळे माझा प्रेमावरचा विश्वास उडाला आहे असे मी म्हणणार नाही. तसेच मी प्रेमासाठी माझी दारे बंद केली आहेत असे नाही. एक व्यक्ती माझ्या आयुष्यात आला आणि तो निघून गेला. त्यामुळे माझे आयुष्य संपले आहे असे मानणारी मी नाहीये. आम्ही दोघेही आमच्या आयुष्यात पुढे गेलेलो आहोत. कोणीच परफेक्ट नसते. माझा आज घटस्फोट झाला असला तरी त्या काळातील काही वाईट आठवणी आहेत असे मी म्हणणार नाही. या गोष्टीमुळे मला खूप काही शिकायला मिळाले. त्यामुळे मी करणचे यासाठी आभारच मानेन. माझ्या आयुष्यात ही घटना घडली नसती तर आज मी वेगळी व्यक्ती असती असे मला वाटते. लग्न या संस्थेवर माझा विश्वास असून मी भविष्यात नक्कीच लग्नाचा विचार करेन. आयुष्यात चुकांमधूनच माणूस शिकत असतो असे मला वाटते. त्यामुळे भविष्यात मी माझ्या मुलांनादेखील तुम्ही अधिकाधिक चुका करा... त्यातूनच तुम्ही शिकाल असे सांगेन. माझ्या आयुष्यात आलेल्या या चढ-उतारात माझ्या कुटुंबियांनी आणि माझ्या मित्रमैत्रिणींनी मला चांगलीच साथ दिली. करण सिंग ग्रोव्हरने जेनिफरला घटस्फोट देऊन अभिनेत्री बिपाशा बासूसोबत लग्न केले आहे.