Join us

'आई कुठे काय करते'मधील वीणा झळकणार नव्या मालिकेत, व्हिडीओ आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2023 13:46 IST

Khushaboo Tawde : 'आई कुठे काय करते' मालिकेतून वीणाच्या भूमिकेतून अभिनेत्री खुशबू तावडे घराघरात पोहचली आहे. खुशबू आता लवकरच एका नव्या मालिकेत पाहायला मिळणार आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'आई कुठे काय करते'(Aai Kuthe Kay Karte)ने कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतून वीणाच्या भूमिकेतून अभिनेत्री खुशबू तावडे (Khushaboo Tawde) घराघरात पोहचली आहे. खुशबू आता लवकरच एका नव्या मालिकेत पाहायला मिळणार आहे. तिच्या नव्या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या मालिकेचे नाव आहे 'सारं काही तिच्यासाठी'. खुशबूसोबत या मालिकेत अभिनेते अशोक शिंदे आणि अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

सारं काही तिच्यासाठी मालिकेची कथा दोन बहिणींच्या नात्यावर आधारीत आहे. काही कारणांमुळे २० वर्ष एकमेकांपासून दूर राहिलेल्या या बहिणींना नियती एकत्र आणू शकेल का अशी कथा मालिकेची आहे. या मालिकेत खुशबू आणि शर्मिष्ठा बहिणींच्या भूमिकेत आहेत.

खुशबू ही गावात राहणारी साधीभोळी घरंदाज स्त्री आहे तर शर्मिष्ठा ही परदेशात स्थायिक असलेली वर्किंग वूमन दाखवण्यात आली आहे. अशोक शिंदे हे खुशबूचे पती दाखवण्यात आले आहेत. त्या दोघींनाही एक एक मुलगी आहे. 'सारं काही तिच्यासाठी' ही मालिका २१ ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७ वाजता ही मालिका प्रदर्शित होणार आहे. मालिकेत खुशबू एक वेगळ्याच अंदाजात पाहायला मिळते आहे. ती चक्क मालवणी बोलताना दिसते आहे. 

टॅग्स :आई कुठे काय करते मालिका