Join us

वैशाली सामंत, स्वप्निल बांदोडकर, आर्या आंबेकर, हृषिकेश रानडेच्या स्वरसाजातील ‘जिवलगा’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2019 18:30 IST

स्टार प्रवाह वाहिनीवर २२ एप्रिलपासून सुरु होणाऱ्या ‘जिवलगा’ या मालिकेची चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवर २२ एप्रिलपासून सुरु होणाऱ्या ‘जिवलगा’ या मालिकेची चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. स्वप्निल जोशी, अमृता खानविलकर, सिद्धार्थ चांदेकर, मधुरा देशपांडे अशी तगडी स्टारकास्ट असणाऱ्या या मालिकेचे शीर्षकगीत नुकतेच  सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले. या गाण्याला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. वैशाली सामंत, स्वप्निल बांदोडकर, आर्या आंबेकर, हृषिकेश रानडे या सुप्रसिद्ध कलाकारांच्या आवाजात हे गाणे ध्वनीमुद्रीत करण्यात आले आहे. 

‘जग सारे इथे थांबले वाटते... भोवताली तरी चांदणे दाटते...मर्मबंधातल्या या सरी बरसता... ऊन वाटेतले सावली भासते.... ओघळे थेंब गाली सुखाचा मिटे अंतर लपेटून घेता...तू माझा मीच तुझी सख्या जिवलगा...ऐल ही तूच अन् पैलही तू सख्या जिवलगा...’ असे सुंदर शब्द या शीर्षकगीताचे आहेत. गीतकार श्रीपाद जोशींनी हे गाणे लिहिले असून निलेश मोहरीरने या गाण्याला संगीत दिले आहे. 

‘जिवलगा’मध्ये नातेसंबंधांचे अनेक पैलू उलगडत गेलेले प्रेक्षकांना पाहायला मिळतील. मानवी स्वभाव आणि त्यात दाखविलेली प्रगल्भता व विचार करण्याची पद्धत यांची एक वेगळी शैली या कथेतून पुढे येणार आहे.

बऱ्याचदा आपली नाती समजून घेण्याची आणि त्यांचे मूल्यमापन करण्याची पद्धत चुकते. आपल्या अवतीभवती असलेल्या माणसांबद्दलचे आपले अंदाज चुकतात. याचा गोष्टींवर ही कथा प्रकाश टाकते. प्रेमामध्ये काय ताकद असते, हेसुद्धा या कथेतून अधोरेखित होते. त्यामुळे ही कथा प्रत्येक घरातील प्रेक्षकाला आपलीशी वाटेल.

‘जिवलगा’ मालिकेच्या प्रोमोजनी याआधीच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या मालिकेच्या शीर्षक गीतालाही प्रतिसाद मिळतो आहे. ‘जिवलगा’ २२ एप्रिलपासून सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर पहायला मिळणार आहे.

टॅग्स :सिद्धार्थ चांदेकरअमृता खानविलकरस्वप्निल जोशी