Join us  

सुरु होतोय नवा सिंगिग रिऍलिटी शो, वैशाली सामंत तब्बल १० वर्षांनंतर पुन्हा एकदा जजच्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2021 3:23 PM

‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद’ या कार्यक्रमात जजच्या भूमिकेत रसिकांच्या भेटीला येणार सचिन पिळगावकर, लोकप्रिय गायिका वैशाली सामंत आणि तरुणाईच्या गळ्यातला ताईत असणारा गायक आदर्श शिंदे.

छोट्या पडद्यावर सुरु होतंय गाण्याचं नवं पर्व अर्थातच ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद’. ५ ते १४ या वयोगटातील छोट्या उस्तादांना या अनोख्या कार्यक्रमात झळकण्याची संधी मिळणार आहे. या कार्यक्रमात जजच्या भूमिकेत दिसतील सुप्रसिद्ध अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक आणि गायक सचिन पिळगावकर, लोकप्रिय गायिका वैशाली सामंत आणि तरुणाईच्या गळ्यातला ताईत असणारा गायक आदर्श शिंदे. सचिन पिळगावकर यांना आपण याआधी जजच्या भूमिकेत पाहिलं आहे. मात्र सिंगिंग शो ते पहिल्यांदाच जज करणार आहेत. तर वैशाली सामंत तब्बल १० वर्षांनंतर पुन्हा एकदा जजच्या भूमिकेत दिसतील.

या कार्यक्रमाविषयी सांगताना सचिन पिळगांवकर म्हणाले, ‘मी आजवर पार्श्वगायक म्हणून २०० पेक्षा अधिक गाणी गायली आहेत. मी बऱ्याच गाण्यांचं संगीत दिग्दर्शनही केलं आहे. मात्र मी सिंगिंग शो आजवर जज केलेला नाही. 'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद' या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी पहिल्यांदाच सिंगिग शो जज करणार आहे. त्यामुळे खुपच उत्सुकता आहे. लहान मुलांसोबत त्यांच्या जगात हरवण्याची संधी हा कार्यक्रम नक्की देईल अशी भावना सचिन पिळगावकर यांनी व्यक्त केली.’

तर वैशाली सामंत म्हणाल्या, आताची पीढी ही टेक्नोसॅव्ही आहे. या पीढीसोबत जुळवून घेणं महत्त्वाचं आव्हान असणार आहे. तसं पाहिलं तर माझा मुलगा १० वर्षांचा आहे त्यामुळे मी १० वर्ष आईपण जगते आहे. त्यामुळे या कार्यक्रमातील मुलांना आईसारखंच प्रेम देईन. त्यांच्या वयाला साजेसं त्यांना ग्रुम करणं, त्यांच्यातलं बेस्ट शोधून काढणं याची जबाबदारी आहे.’

आदर्श शिंदे देखील या कार्यक्रमासाठी खुपच उत्सुक आहे.हा कार्यक्रम नवी ऊर्जा आणि भरभरुन आनंद घेऊन येईल असं आदर्शने सांगितलं.४ डिसेंबरपासून रात्री ९ वाजता हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून सचिन पिळगावकर, वैशाली सामंत, आदर्श शिंदे हे त्रिकुट हा कार्यक्रम जज करणार आहेत. तर अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि बालकलाकार अवनी जोशी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहेत. महाराष्ट्रभरातून ऑनलाईन पद्धतीने झालेल्या निवड चाचणीतून या कार्यक्रमासाठी स्पर्धकांची निवड करण्यात आली आहे. 

टॅग्स :वैशाली सामंतसचिन पिळगांवकर