Join us  

'पवित्र रिश्ता २'मध्ये दिसणार नाहीत उषा नाडकर्णी, कारण आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 1:09 PM

पवित्र रिश्ताचा सीक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र यात उषा नाडकर्णी दिसणार नाहीत.

छोट्या पडद्यावरील हिंदी मालिका पवित्र रिश्ता खूप लोकप्रिय ठरली होती. १ जून २००९ साली पहिला भाग प्रदर्शित झालेली ही मालिका २०१४ सालापर्यंत प्रेक्षकांचे मनोरंजन करत राहिली. आजही या मालिकेतील कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेत सुशांत सिंग राजपूत, अंकिता लोखंडे, सविता प्रभुणे, प्रिया मराठे, उषा नाडकर्णी, किशोर महाबोले, प्रार्थना बेहेरे हे कलाकार होते. आता या मालिकेचा सीक्वल येणार असल्याचे समजते आहे. या मालिकेत अर्चनाची भूमिका साकारणारी अभिनेत्री अंकिता लोखंडे सीक्वलमध्ये पहायला मिळणार आहे. मानवच्या भूमिकेसाठी अभिनेत्याचा शोध सुरू आहे. मात्र आता या सीक्वलमध्ये उषा नाडकर्णी दिसणार नसल्याचे समजते आहे.

पवित्र रिश्ताच्या सीक्वलमध्ये उषा नाडकर्णी दिसणार नाहीत. त्यामागचे कारणही तसेच आहे. उषा नाडकर्णी यांनी आपल्या वयाची सत्तरी ओलांडली आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव आणि आपल्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांनी ही मालिका करत नसल्याचे सांगितले आहे.

उषा नाडकर्णी या डायबिटीज पेशंट आहेत त्यामुळे आरोग्याच्या कारणास्तव त्यांनी ही मालिकाच करत नसल्याचे जाहीर केले आहे. शिवाय त्यांच्या कुटुंबीयांनी देखील सध्याच्या कठीण काळात त्यांना काम करण्यास मनाई केली आहे. 

उषा नाडकर्णी या मराठी सिनेइंडस्ट्रीत खाष्ट सासू म्हणून चांगल्याच परिचयाच्या आहेत. आजवर त्यांनी आपल्या अभिनयातून उत्तमोत्तम भूमिका साकारून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

हिंदी सृष्टीतही पवित्र रिश्ता मालिकेतून त्या सासूच्या भूमिकेचा दबदबा टिकवून ठेवताना दिसल्या होत्या. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव त्यांनी मालिकेत काम करत नसल्याचा घेतलेला हा निर्णय योग्यच आहे अशा चर्चा सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. 

टॅग्स :उषा नाडकर्णीअंकिता लोखंडेसुशांत सिंग रजपूत