Join us  

मराठीतील ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे अंथरुणाला खिळून, वृत्त समजताच मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 12:18 PM

छोट्या पडद्यावरील या प्रसिद्ध अभिनेत्रीची अवस्था पाहून चाहते हैराण झाले आहेत.

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्रीचा नुकताच भीषण अपघात झाल्याचे समोर आले होते. ही अभिनेत्री म्हणजे वर्षा दांदळे.  वर्षा दांदळे सध्या पाहिले न मी तुला या मालिकेत उषा मावशीच्या भूमिकेत दिसत आहेत. त्यांनी साकारलेल्या प्रत्येक भूमिकांचे प्रेक्षकांनी नेहमीच कौतुक केले आहे. वर्षा दांदळे यांनी आपल्या अपघाताचे वृत्त नुकतेच इन्स्टाग्रामवर शेअर केले होते.या अपघातात त्यांच्या मणक्याला आणि उजव्या पायला देखील मोठी दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांना हालचाल करणेही शक्य नाही. त्यांची अवस्था पाहून चाहते हैराण झाले आहेत आणि त्यांना लवकर बरे वाटावे, म्हणून प्रार्थना करत आहेत.  ही बातमी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना समजली. त्यांनी या अपघाताची दखल घेतली आहे. वर्षा दांदळे या बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षिका देखील आहेत. त्यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांना नाशिकला पाठवले.

किशोरी पेडणेकर यांनी नाशिकला जाऊन वर्षा दांदळे यांच्या तब्येतीची चौकशी केली आणि नव्या उमेदीने पुन्हा कला क्षेत्र सक्रिय होणार अशा शुभेच्छा दिल्या आहेत. स्वतः वर्षा ताईंनी आपली दखल घेतली असल्याने मुख्यमंत्री आणि किशोरी पेडणेकर यांचे आभार मानले आहेत. वर्षा दांदळे यांनी सोशल मीडियावर याबाबत पोस्ट शेअर करत म्हटले की, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षिका व अभिनेत्री वर्षा दांदळे यांच्या अपघाताची बातमी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना समजताच त्यांनी वर्षा दांदळे यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना नाशिक येथे जाऊन त्यांची भेट घेण्याचे निर्देश दिले. त्यानुसार मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी शिक्षिका व अभिनेत्री वर्षा दांदळे यांची नाशिक येथील त्यांच्या राहत्या घरी जाऊन भेट घेतली तसेच तब्येतीची आस्थेने विचारपूस केली. तसेच पुन्हा आपण चित्रपट क्षेत्रात नव्या उत्साहाने, उमेदीने काम करून प्रेक्षकांचे मनोरंजन करावे, अशा शुभेच्छा दिल्या. यासोबतच आजारातून लवकर बरे होण्यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना केली. याप्रसंगी नगरसेविका सिंधू मसुरकर उपस्थित होत्या. धन्यवाद मुख्यमंत्री साहेब, धन्यवाद महापौर मॅडम, कलाकाराला तुमच्या राज्यात मान आहे प्रेम आहे शतशः प्रणाम…”

पेशाने संगीत शिक्षिका असलेल्या वर्षा दांदळे यांना काही नाटकांत काम करण्याची संधी मिळाली होती. त्यांचे नाटकांतील काम पाहून त्यांना मालिकेत काम करण्याची संधी मिळाली आणि त्यांनी या संधीचे सोने केले. नांदा सौख्य भरे या मालिकेतील वच्छी आत्या घराघरात पोहचली आणि या भूमिकेनंतर त्यांनी पुन्हा मागे वळून पाहिले नाही. नकटीच्या लग्नाला यायचं हं या मालिकेत लता काकूंची भूमिका केली. या मालिकेनंतर घाडगे अँड सून मालिकेत सुकन्या कुलकर्णीची मोठी जाऊ साकारली. 

टॅग्स :उद्धव ठाकरेकिशोरी पेडणेकर