Join us  

Raghav Juyal: राघव जुयालनं पुन्हा मन जिंकलं! 'डान्स प्लस'च्या स्पर्धकाला केली ८ लाखांची मदत; कर्ज फेडलं

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2021 1:23 PM

Raghav Juyal, Dance Plus 6: डान्स प्लसमधील एका स्पर्धकाच्या वडिलांचं कोरोनामुळे निधन झालं आणि त्याच्या डोक्यावर वडिलांनी घेतलेलं ८ लाखांचं कर्ज बाकी राहिलंय.

Raghav Juyal, Dance Plus 6: डान्सर, कोरिओग्राफर आणि अँकर राघव जुयाल (Raghav Juyal) याची सेटवरील धमालमस्ती व त्याच्या स्लो-मोशन डान्सचे तर सर्व चाहते आहेतच. पण त्यानं केलेल्या एका कृतीनं अनेकांची मनं जिंकली आहेत. डान्स प्लसचं सहावं सीझन नुकतंच सुरू झालं आहे आणि यातही राघव जुयाल अँकरच्या भूमिकेत पाहायला मिळतो आहे. राघवनं यावेळी एका स्पर्धकाची अडचणी समजून घेत त्याला थेट ८ लाख रुपयांची मदत करण्याची घोषणाच करुन टाकली आहे. 

'डान्स प्लस' हा टेलिव्हिजन रिआलिटी शो अतिशय लोकप्रिय असून यंदाच्या सहाव्या सीझनमध्येही दमदार स्पर्धेक कार्यक्रमाला लाभले आहेत. रिआलिटी शो म्हटलं की प्रत्येक स्पर्धकाची एक स्वत:ची अशी एक कहाणी असते. त्यामागचं स्ट्रगल असतं. असाच एक स्पर्धक यंदा डान्स प्लसमध्ये मोठ्या अडचणींवर मात करुन पोहोचला आहे. एवन नागपुरे असं या स्पर्धकाचं नाव असून त्यानं शोमध्ये जबरदस्त डान्स केल्यानंतर त्याच्यावरची आपबिती कथन केली. केवळ १० लाख रुपये कमावण्यासाठीच आपण या शोमध्ये आल्याचं त्यानं सांगितलं. त्यामागचं कारण अतिशय भावनिक होतं. वडिलांनी काढलेलं कर्ज फेडता यावं यासाठी तो पैसे जमा करतोय. 

एवन नागपुरे याच्या वडिलांचं कोरोनानं निधन झालं आहे. ऑक्सिजनची कमतरता आणि वेळेवर बेड न मिळाल्यानं वडिलांचा मृत्यू झाल्याचं त्यानं शोमध्ये सांगितलं. त्यानंतर राघव जुयाल खूपच भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं. एवन नागपुरे याच्या वडिलांनी १० लाखांचं कर्ज काढलं होतं. त्यातील दोन लाखांचं कर्ज फेडता आलं आहे. तर ८ लाखांचं कर्ज अजूनही बाकी आहे. वडिलांनी काढलेलं कर्ज फेडता यावं यासाठीच शोमध्ये आल्याचं एवन यांनं प्रामाणिकपणे सांगितलं. एवन याची गोष्ट ऐकून राघव जुयाल स्वत:ला रोखू शकला नाही. त्यानं एवनच्या वडिलांचं बाकी राहिलेलं सर्व कर्ज फेडण्याची घोषणाच शोमध्ये करुन टाकली. त्यानं एवन याला ८ लाख रुपयांची मदत करण्याचं आश्वासन दिलं. त्यानंतर सर्वांनीच टाळ्या वाजवून राघवच्या पुढाकाराचं कौतुक केलं. एवन सध्या शोमध्ये कोरिओग्राफर पुनीत पाठक याच्या टीमचा सदस्य आहे. 

राघवच्या या पुढाकाराचं सोशल मीडियातही जोरदार कौतुक केलं जात आहे. समाजाप्रती आपली बांधिलकी दाखवण्याचं राघव जुयाल याची ही काही पहिलीच वेळ नाही. त्यानं याआधी कोरोना काळात उत्तराखंडमधील नागरिकांना मोठी मदत केली आहे. तर अनेक स्पर्धकांसाठीही तो मेहनत घेत असतो. आता एवनला केलेल्या मदतीनं त्यानं पुन्हा एकदा अनेकांच्या मनात घर केलं आहे. 

टॅग्स :नृत्यरेमो डिसुझाटेलिव्हिजन