Join us  

Tula Pahate Re मालिकेतील ‘सरंजामेची सून’ रिअलमध्ये आहे जबरदस्त स्टायलिश !

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2018 11:52 AM

या मालिकेतील जयदीप सरंजामे आणि त्याची पत्नी यांचीही रसिकांकडून विशेष चर्चा आहे. जयदीपची पत्नी विक्रांत सरंजामेला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी प्रयत्न करताना दिसणार आहे.

छोट्या पडद्यावर वय विसरायला लावणारी जगावेगळी प्रेम कहाणी म्हणजेच 'तुला पाहते रे' ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरत आहे. या मालिकेत अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री गायत्री दातार यांची केमिस्ट्री रसिकांना भावते आहे. या मालिकेतील जयदीप सरंजामे आणि त्याची पत्नी यांचीही रसिकांकडून विशेष चर्चा आहे. जयदीपची पत्नी विक्रांत सरंजामेला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी प्रयत्न करताना दिसणार आहे. 

त्यामुळे एकीकडे विक्रांत आणि ईशाची प्रेमकहाणी तर दुसरीकडे जयदीपच्या पत्नीचे डावपेच यामुळे ही मालिका आणखी रंगतदार ठरणार आहे. मात्र जयदीपची पत्नी आणि सरंजामेंची ही सून ही भूमिका साकारणारी ही अभिनेत्री कोण हे तुम्हाला माहिती आहे का? या अभिनेत्रीचे नाव आहे पूर्णिमा डे. ती याआधी गर्ल्स हॉस्टेल या मालिकेत झळकली होती. पूर्णिमा ही बरीच स्टायलिश आहे. तिचे फोटो पाहून तुम्हीसुद्धा आश्चर्यचकीत झाल्याशिवाय राहणार नाही. ती एक मॉडेल, अभिनेत्री तसेच एक सुंदर गायिका म्हणूनही ओळखली जाते. 

स्पा, कपड्यांच्या जाहिरातीसाठी तिने मॉडेलिंगही केले आहे. लवकरच ती गॅट मॅट-आम्ही जुळून देतो या सिनेमातून रूपेरी पडद्यावरही झळकणार आहे. या सिनेमातून ती पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. तिच्यासोबत माझ्या नवऱ्याची बायको फेम शनाया म्हणजेच रसिका सुनीलही या सिनेमात पाहायला मिळणार आहे. पूर्णिमा ही शाहरूख खानची जबरदस्त फॅन आहे. तसंच लागीर झालं जी मालिकेतील शीतली अर्थात शिवानी तिची चांगली मैत्रीण आहे. पूर्णिमा सोशल मीडियावरही अॅक्टिव्ह असते. तिच्या खास आवाजातील गाणीही तिने आपल्या फेसबुकवर अपलोड केली आहेत. रंग फिल्म आणि इंटरनॅशनल व्हिडीओ अल्बममध्येही ती झळकली आहे. 

या मालिकेतून अभिनेता सुबोध भावे आणि नवोदित अभिनेत्री गायत्री दातार मुख्य भूमिका साकारत आहे. ईशा आणि विक्रांत सरंजामे यांची अनोखी कहाणी सगळ्यांना पसंत पडत आहे. विक्रांत सरंजामे म्हणजे शहरातील एक मोठा बिझनेसमन. खूप श्रीमंत, आलिशान घर असलेला विक्रम आणि दुसरीकडे चाळीत, मध्यमवर्गीय कुटुंबात राहणारी ईशा निमकर जी अतिशय सामान्य पार्श्वभूमीत वाढली आहे. हे दोघे कसे भेटतात, त्यांची मैत्री कशी होते आणि त्या मैत्रीचं प्रेमात कधी रुपांतर होतं हे पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे.

मालिकेला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आणि प्रेक्षकांच्या प्रेम आणि पाठिंब्यामुळे प्रत्येक आठवड्यात मालिका टि.आर.पी. चे उच्चांक गाठत आहे. नुकतंच या मालिकेने टि.आर.पी.चा उच्चांक गाठून टॉप शोजच्या लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकाचे स्थान मिळवले. मालिकेच्या संपूर्ण टीमने सेटवर केक कापून हा आनंद साजरा केला.

टॅग्स :तुला पाहते रे