कलर्स मराठीवर सुरू असलेली शेतकरीच नवरा हवा मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या मालिका अत्यंत महत्वाच्या विषयावर आधारित आहे. जिथे मुलींना शेतकरी नवरा नको असतो, शेतकऱ्याच्या मुलाला शेतकरी पण मुलगी द्यायला तयार नाही तिथे एका उच्चभ्रू घराण्यातील शहरी, सुशिक्षित मुलगी, जेव्हा म्हणते मला शेतकरीच नवरा हवा तेव्हा काय होईल ? ते आपल्याला कळेलच. या मालिकेचे शूट सातारला सुरू आहे. रेवाची भूमिका साकारणारी ऋचाचे आपण अनेक व्हिडीओ, रील सोशल मीडियावर बघतो. ज्यामध्ये कधी गायनाचा रियाज करत असते तर कधी चित्र काढत असते. सेटवर मिळालेल्या वेळेमध्ये ती आपले छंद जोपासते.
याविषयी बोलताना ती म्हणाली, "मी गेल्या सात वर्षांपासून गाणं गाते आहे. आधी मी शास्त्रीय संगीत शिकले. माझ्या गुरू माधुरी नाईक त्यांच्याकडे शास्त्रीय संगीत शिकताना त्यांना असं जाणवलं की माझा आवाज वेगळा आहे, थोडं वेगळ्या कलेने घेतलं पाहिजे... तेव्हा त्यांनी मला फ्युजनकडे जाण्यासाठी मोटिवेट केले आणि आम्ही दोघींनी माझ्या शैलीवर काम करून माझी स्टाईल तयार केली.
ती पुढे म्हणाली की, लहापणापासूनच मला खूप आवड होती मग ते गाणं असो डान्स असो अक्टिंग असो. जेव्हा शेतकरीच नवरा हवा मालिकेसाठी विचारणा झाली तेव्हा उत्सुकता होती पण भीती पण होती कारण कधीच कॅमेरा फेस नव्हता केला... प्रत्येक दिवशी नवं आव्हानं असतं आणि तीच गंमत आहे असं मला वाटतं... मी खूप नशीबवान आहे की मला ही संधी मिळाली. पेंटिंगबद्दल सांगायचं झालं तर माझ्या पहिल्या गुरू जयवंती प्रभूतेंडुलकर... ज्यांनी मला पेंट ब्रश कसा धरायचा हे शिकवलं... नंतर मी ११ वी आणि १२ वी मध्ये फाईन आर्ट्स घेतले आणि मग तिथून प्रवास सुरू झाला आणि मी abstract creative painting शिकले. माझ्या गुरूंचे आभार ज्यांनी मला हे सगळे शिकवले.