Join us

निडर मुलीची कथा 'दबंगी – मुलगी आई रे आई' मालिकेत, ३० ऑक्टोबरपासून येणार भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2023 17:54 IST

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन वाहिनीवर लवकरच ‘दबंगी – मुलगी आई रे आई’ ही मालिका दाखल होत आहे. या मालिकेतून एका आर्या नामक चुणचुणीत आणि निडर मुलगी भेटीला येणार आहे.

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन वाहिनीवर लवकरच ‘दबंगी – मुलगी आई रे आई’ ही मालिका दाखल होत आहे. या मालिकेतून एका आर्या नामक चुणचुणीत आणि निडर मुलगी भेटीला येणार आहे. आपल्या वडीलांना भेटण्यासाठी आसूसलेल्या, त्यांचा शोध घेणाऱ्या एका मुलीची ही गोष्ट प्रेक्षकांना नक्की खिळवून ठेवेल. या शोधात तिला अनेक रहस्ये उलगडतील आणि एकमेकांत गुंतलेल्या नात्यांचा शोध लागेल, ज्याने छोट्या आर्याच्या विश्वात मोठी उलथापालथ होईल.

माही भद्रा, सई देवधर, आमीर दलवी आणि मानव गोहिल यांसारखे सुपरिचित कलाकार या मालिकेतील व्यक्तिरेखा जिवंत करणार आहेत. त्यांच्या अभिनयातून मानवी भावनांचे विविध पदर उलगडत जातील आणि त्यांच्या मनातील सुष्ट आणि दुष्ट यांच्यातील चिरंतन लढ्याचे दर्शन घडेल. बाल कलाकार माही भद्रा आर्याची भूमिका करत आहे. आर्याचा समज आहे की, तिचे वडील सुपरकॉप आहेत आणि एका मिशनवर गेले आहेत त्यामुळे तिची त्यांच्याशी भेट झालेली नाही पण तिला आपल्या घराण्याचे सत्य माहीत नाहीये. तिची आई छाया (सई देवधर) हिने आर्यापासून हे सत्य लपवून ठेवले आहे की, ती ‘सत्या’(आमीर दलवी)ची मुलगी आहे, जो कुणी सुपरकॉप नाही, तर एक दादागिरी करणारा गुंड आहे. मानव गोहिल सीनियर इन्स्पेक्टर अंकुश राजवाडकरची भूमिका करत आहे, जो सत्याचा भाऊ आहे आणि त्याच्याही नकळत, आर्याने आपल्या पित्याची जी प्रतिमा मनात जोपासली आहे, तसाच तो आहे. या सगळ्यांची आयुष्ये एकमेकांत कशी गुंतली आहेत याचा शोध घेणे प्रेक्षकांसाठी मनोरंजक असेल.

दबंगी – मुलगी आई रे आई ही दोन विरुद्ध विचारसरणींची एक आगळीवेगळी गोष्ट आहे. या विचारसरणींचे मुख्य प्रतिनिधी आहेत, सत्या आणि अंकुश हे दोन भाऊ. यापैकी सत्याला नैतिकतेची चाड नाही, तर अंकुश नीती मूल्यांची जोपासना करणारा आहे आणि या दोघांच्या दरम्यान आहे, आर्या.  ३० ऑक्टोबर रोजी सुरू होत असलेली ही मनोरंजक मालिका दर सोमवार ते शुक्रवार रात्री ८.३० वाजता प्रसारित होणार आहे.