'प्रथाओं की ओढे चुनरी: बींदणी' (Prathaon Ki Ode Chunari: Bindani) ही नवी कोरी मालिका लवकरच सन नियो वाहिनीवर भेटीला येणार आहे. या मालिकेचा नवीन प्रोमो नुकताच प्रदर्शित केला आहे. या प्रोमोमध्ये मालिकेच्या मुख्य अभिनेत्रीचा खुलासा करण्यात आला आहे. अभिनेत्री गौरी शेळगावकर (Gauri Shelgaonkar) घेवर ही प्रमुख भूमिका साकारणार आहे.
मालिकेच्या प्रोमोची सुरुवात होते संध्याकाळच्या राजस्थानच्या वाळवंटात. घेवर वाळूतून धावत असताना ती अचानक एका फोटो फ्रेमकडे आकर्षित होते. ती जमिनीवर बसून ती फ्रेम अलगद हाताने साफ करते, डोळ्यांत भावना दाटून आलेल्या असतात. आणि त्याच क्षणी एका पाळण्यातून बाळाच्या रडण्याचा आवाज येतो. घेवर ते बाळ उचलते. पण इतक्या ओसाड वाळवंटात ते बाळ कसं काय पोहोचलं? घेवरचा आणि त्या बाळाचा काय संबंध? हे दृश्य जितकं हृदयस्पर्शी आहे, तितकंच अनेक प्रश्न निर्माण करणारं आहे.
गौरी शेळगावकर म्हणाली की, '''घेवर' हे पात्र साकारताना मी खूप आनंदी आणि उत्साहित आहे. जेव्हा मला या पात्राचं नाव समजलं, तेव्हाच त्या नावानेच माझं लक्ष वेधून घेतलं. घेवर ही एक प्रसिद्ध मिठाई आहे आणि या पात्राचं नाव तिच्या गोड स्वभावाशीही जुळतं असं वाटलं. आमची कथा राजस्थानच्या पार्श्वभूमीवर आधारित असून, राजस्थानी पोशाख आणि दागिन्यांची कल्पना ऐकताच मी अधिकच उत्साहित झाले.''
''माझ्यासाठी एक स्वप्नपूर्तीचा क्षण आहे''
ती पुढे म्हणाली, ''लेखक आणि निर्माते रघुवीर शेखावत सरांसोबत काम करणं म्हणजे माझ्यासाठी एक स्वप्नपूर्तीचा क्षण आहे. त्यांनी जेव्हा हे पात्र समजावून सांगितलं, तेव्हा मी लगेचच होकार दिला. मुख्य म्हणजे या भूमिकेमुळे मी एक अभिनेत्री म्हणून खूप काही शिकू शकते. अशा संधीची मी खूप दिवसांपासून वाट पाहत होते. निर्मात्यांचे आणि ‘सन नियो’चे मन:पूर्वक आभार. मला आशा आहे की प्रेक्षकांना माझी भूमिका आणि मालिका दोन्ही आवडतील.''