Join us
Daily Top 2Weekly Top 5

'तुझेच मी गीत गात आहे'मध्ये या प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री, साकारणार मंजुळाच्या आईची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2023 18:39 IST

Tuzech Mi Geet Gaat Aahe : 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेत मंजुळा कामतची एन्ट्री झाल्यापासून कथानक उत्कंठावर्धक वळणावर आली आहे.

स्टार प्रवाहवरील तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत मंजुळा कामत यांच्या घरात आल्यापासून कथानक उत्कंठावर्धक ठरले आहे. मंजुळा अजून मल्हारसमोर आलेली नाही मात्र लवकरच ती कोण आहे हे त्याला समजेल अशी आशा मालिकेच्या प्रेक्षकांना आहे. स्वराज मंजुळाला कायम आई म्हणून हाक मारत असतो. आता तर स्वराजचा मामाच वैदेहीचा फोटो दाखवून मंजुळाला यामागचे गुपित सांगतो. मंजुळा पाठोपाठ आता या मालिकेत तिच्या आईची सुद्धा एन्ट्री होणार आहे. मंजुळाच्या आईच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाईक दिसणार आहेत. 

नुकतेच उषा नाईक यांनी शूटिंगला सुरुवात केली आहे. उषा नाईक यांची ही भूमिका सकारात्मक असणार की नकारात्मक हे अजून गुलदस्यात आहेत. येत्या काही भागातच त्या मालिकेत दिसणार आहेत. तूर्तास ही भूमिका साकारण्यासाठी उषा नाईक खूप उत्सुक असल्याचे सांगतात. उषा नाईक मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी जीवाची होतीया काहिली मालिकेत भद्राक्काची भूमिका साकारली होती. छोट्या मोठ्या भूमिकेतून उषा नाईक कायम मराठी हिंदी मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. 

'तुझेच मी गीत गात आहे' मालिकेत मंजुळा गुंडांना मिळालेली असते. स्वराजच्या माऊथ ऑर्गनमध्ये तिने हिरे लपवलेले असतात . त्याचा शोध घेण्यासाठी ती कामतांच्या घरी राहायला येत असते. मात्र इथे आल्यानंतर तिला तिचे हिरे शोधण्यास अडथळे येत आहेत. आता तर तिच्या मदतीला तिच्या आईची देखील एन्ट्री होणार आहे. मंजुळा हीच वैदेही आहे का? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. या प्रश्नाचे उत्तर आता तिची आई देणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.