Join us  

"आई कुठे काय करते?" तेजश्रीचा हा व्हिडीओ आतापर्यंत इतक्या लाख लोकांनी पाहिला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2019 7:15 AM

'आई कुठे काय करते?' हा तेजश्रीचा भावस्पर्शी संवाद सध्या चांगलाच व्हायरल होतोय. हा प्रसंग तेजश्री प्रधान, निवेदिता सराफ आणि अभिनेता आशुतोष पत्की यांच्यावर चित्रित झालेला आहे.

'होणार सून मी ह्या घरची' मालिकेतील जान्हवीच्या भूमिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री तेजश्री प्रधान हिनं पुन्हा एकदा  'अग्गंबाई सासूबाई'  या मालिकेतून छोट्या पडद्यावर कमबॅक केला आणि पाहता पाहता प्रेक्षकांनी या मालिकेला डोक्यावर उचलून धरलं. मालिकेचं नाविन्य, त्याची आगळी-वेगळी कथा, मालिकेचं वेगळं टेकिंग, निवेदिता सराफ-गिरीश ओक ही जोडी, इत्यादी. या सगळ्यामुळे मालिकेने अल्पशा कालावधीतच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायला सुरुवात केली आहे.

मालिकेत नुकताच प्रसारित झालेला 'आई कुठे काय करते?' हा तेजश्रीचा भावस्पर्शी संवाद सध्या चांगलाच व्हायरल होतोय. हा प्रसंग तेजश्री प्रधान, निवेदिता सराफ आणि अभिनेता आशुतोष पत्की यांच्यावर चित्रित झालेला आहे. रोज घरीच असलेली आई नेमकं काय करते? अशी शंका मनात असणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारा हा व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळतोय. या व्हिडीओला आतापर्यंत जवळपास 102,970  एका लाख दोन हजार नऊशे सत्तर  लोकांनी बघितला आहे.  या प्रसंगातील मनाला भावणारा संवाद आणि तेजश्रीचा सहज सुंदर अभिनय चर्चेत आहे. या प्रसंगाबद्दल बोलताना तेजश्री म्हणाली, "याचं सगळं श्रेय लेखकांचं आहे. पल्लवी करकेरा आणि किरण कुलकर्णी यांनी ते इतके छान आणि सहज लिहिले होते कि ते आपसूकच एक दोन वाचनात सादर करण्यात आले. आईसाठीच्या भावना त्यातल्या प्रत्येक शब्दातून प्रतिबिंबित होतात.

त्यामुळे एक कलाकार म्हणून मी केवळ लेखकांचे शब्द प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले. या विशिष्ट मोनोलॉगची फार तयारी मी मुद्दाम केली नव्हती, कारण त्यात माझा सादरीकरणात कुठलाही तांत्रिकपणा आणायचा नव्हता. त्यामुळे या दृश्याची तालीम न करता पहिल्या टेकमध्ये तो होण्याकडे माझे लक्ष होते. आमचे दिग्दर्शक अजय मयेकर यांनी तशी मोकळीक मला दिली. हे असे सिन ठरवून होत नाहीत. त्यात जरी मी दिसत असली तरी याचे श्रेय लेखक, दिग्दर्शक आणि सहकलाकार यांचंही तितकंच आहे. टीव्ही इंडस्ट्रीतील आपल्या मित्रमैत्रिणींकडून, चाहत्यांकडून कामाचे कौतुक होत असल्याने कामाची जबाबदारी अधिक आहे."  

टॅग्स :झी मराठीअग्गंबाई सासूबाईतेजश्री प्रधान