Join us  

सुनील बर्वे म्हणतोय 'महाराष्ट्र जागते रहो - अजूनही वेळ गेली नाही', वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 5:33 PM

“महाराष्ट्र जागते रहो – अजूनही वेळ गेली नाही” हा एक नवा कार्यक्रम कलर्स मराठी वाहिनी घेऊन येत आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्र जागते रहो – अजूनही वेळ गेली नाही नवा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

कुठलीही दुर्घटना पूर्वसूचना देऊन येत नसते. बऱ्याचदा आपल्या विश्वासातली, आपल्या जवळची व्यक्तीच या दुर्घटनांना जबाबदार असते वा आपण आपल्या नकळत काही गुन्ह्यांना ओढवून घेतो. संस्कृती प्रिय, कलानिष्ठ अशा आपल्या महाराष्ट्रात दररोज काळजाचा थरकाप उडविणाऱ्या, मन छिन्नविच्छिन्न करणाऱ्या काही खळबळजनक बातम्या कानावर येतात. अशा बातम्यांनी सामाजिक शांती तसेच सुरक्षेला तडा जातो. खून, बलात्कार, घरफोडी, घरगुती हिंसा, वृद्धांचा खून करून लुट, अनेक अंगावर शहारा आणणाऱ्या आणि असुरक्षिततेची भावना निर्माण करणाऱ्या, समाजाचे स्वास्थ बिघडवणाऱ्या घटना घडत असतात. पण ही गुन्हेगारी का बोकाळते आहे याचा विचार केला तर या घटनांचे मूळ लक्षात येईल, बहुतांशी याला आपणच जबाबदार असतो. आपल्या या महाराष्ट्राला या गुन्ह्यांमुळे गालबोट लागू न देण्याची जबाबदारी नागरिक म्हणून आपलीही आहे... त्यामुळे वेळीच जागरूक होणे गरजेचे आहे. याच सूत्रावर आधारित “महाराष्ट्र जागते रहो – अजूनही वेळ गेली नाही” हा एक नवा कार्यक्रम कलर्स मराठी वाहिनी घेऊन येत आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अष्टपैलू अभिनेता सुनील बर्वे करणार आहेत. 

याबद्दल सुनील बर्वे म्हणाले, “बऱ्याच वर्षांपासून काहीतरी वेगळे करण्याची इच्छा होती. महाराष्ट्र जागते रहो - अजूनही वेळ गेली नाही सारखा वेगळा कार्यक्रम करण्याची संधी मिळाली मी खूप आनंदी आहे. आपला महाराष्ट्र सगळ्या गोष्टीत अग्रेसर आहे तसाच तो गुन्हेगारीच्या रेकॉर्डस मध्ये देखील अग्रेसर आहे हे कळल तेंव्हा खूप वाईट वाटलं. आपण अनावधाने अनेक गोष्टी बोलून जातो ज्यामुळेच खरतर संकट ओढावत आणि नंतर त्यातूनच गुन्हेगारी घडते. तर अशा दुर्लक्षिलेल्या वागण्यासाठी तुम्हाला सतर्क करणारा हा कार्यक्रम असणार आहे”.  दुष्ट वृत्ती तुमच्या मन:स्थितीचा, परिस्थितीचा फायदा घेऊन, तुमचं विश्व उध्वस्त करण्याचा सापळा रचत असतात, ज्यामध्ये सामन्य माणूस अडकतो आणि मग घडतात मन सुन्न करणाऱ्या अमानवीय, माणुसकीला लाजवणाऱ्या भयानक घटना, गुन्हे ... पण अजूनही वेळ गेली नाही, जागरूक होऊन या गुन्हांनाना सामोरं जाऊ...या करताच संपूर्ण महाराष्ट्राला जागरूक करण्यासाठी कलर्स मराठी घेऊन येत आहे. महाराष्ट्र जागते रहो – अजूनही वेळ गेली नाही ३१ जानेवारीपासून गुरु ते शनि रात्री ९.३० वा. अर्थातच कलर्स मराठीवर प्रसारीत होणार आहे. 

टॅग्स :सुनील बर्वे