'ठरलं तर मग' मालिकेतील पूर्णा आजीची भूमिका ज्यांनी गाजवली त्या ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर (Jyoti Chandekar) यांचं १६ ऑगस्ट रोजी निधन झालं. ज्योती चांदेकरांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत नाटक, मालिका, सिनेमांमध्ये काम केलं. आयुष्याच्या शेवटच्या काळातही त्यांनी पूर्णा आजी या भूमिकेतून सर्वांच्या मनावर छाप पाडली आणि अचानक जगाता निरोप घेतला. त्यांच्या निधनाने संपूर्ण सिनेसृष्टी हळहळली आहे. दरम्यान आता 'ठरलं तर मग' मध्ये पूर्णा आजींच्या जागी कोण दिसणार याबद्दल काही ठरलंय का? यावर निर्मात्या सुचित्रा बांदेकर (Suchitra Bandekar) यांनी उत्तर दिलं आहे.
अभिनेत्री आणि निर्मात्या सुचित्रा बांदेकर यांनी राजश्री मराठीला नुकतीच मुलाखत दिली. ज्योती चांदेकर यांच्या अनेक आठवणी त्यांनी सांगितल्या. तसंच आता मालिकेत पुढे त्यांच्या भूमिकेत कोण येणार यावरही भाष्य केलं. त्या म्हणाल्या, "आम्ही अजून काहीच विचार केलेला नाही. आम्हाला आणि प्रेक्षकांनाही सावरायला वेळ हवा आहे. प्रेक्षकांच्या कमेंट्स आहेत की पूर्णा आजींच्या भूमिकेत त्यांच्याशिवाय अजून कोणाला बघू शकत नाही. त्यामुळे बघू, विचार करु. बघायला गेलं तर त्या स्वत: नाटकातल्या होत्या त्यांनाही माहित आहे की शो मस्ट गो ऑन!"
सांगितली जुनी आठवण
सुचित्रा बांदेकर म्हणाल्या, "त्या मध्यंतरी लीलावतीत अॅडमिट होत्या. आदेश आणि सोहम त्यांना बघायला गेले होते. तेव्हा त्या आदेशला म्हणाल्या, 'सुचित्राला सांग हं मला रिप्लेस करु नको. मी बरी होऊन येणार आहे'. आदेश म्हणाला, 'कोणी सांगितलं तुम्हाला रिप्लेस करणार ते?'. त्या म्हणाल्या, 'या नर्स मला बातम्या दाखवतात.' कसं म्हणजे किती ते प्रेम शब्दात मांडता येऊ शकत नाही."
"मी त्यांच्या अंत्यदर्शनाला जाऊन आले. शांत पडली होती बाई. कालपर्यंत आपल्याशी बोलणाऱ्या या अशा निपचित पडून राहिल्या. तिने वेळच दिला नाही. स्वत:च्या तब्येतीकडे तिने बहुतेक लक्षच दिलं नाही. इतक्या वर्षांनी माझ्या मुलीला बाळ होणार आहे मला तेव्हा सुट्टी लागणारच असंही मला म्हणाल्या होत्या. सगळ व्यवस्थित झालं, बाळाचे लाड केले. आता अचानक निघून गेल्या त्या कायमच्याच."