स्टार प्रवाह प्रेक्षकांसाठी नव्या मालिकांचा खजिना घेऊन आला आहे. लपंडाव, होऊ दे धिंगाणा या मालिकांनंतर आणखी एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नव्या मालिकेची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. त्याचा प्रोमोही प्रदर्शित करण्यात आला आहे. 'नशीबवान' असं नव्या मालिकेचं नाव असून या मालिकेतून दमदार कलाकार प्रेक्षकांच्या पुन्हा भेटीला येणार आहेत.
'नशीबवान' मालिकेच्या प्रोमोमध्ये कृष्णजन्माष्टमीचा सोहळा होत असल्याचं दिसत आहे. "कृष्ण जन्मला कंसाचा काळ जो बाळा जो जो रे जो", असं गाणं मालिकेतील मुख्य कलाकार म्हणत आहेत. तेवढ्यातच "माझी भीती खरी ठरली...पत्रिकेप्रमाणे तुमचे फासे उलटे पडायला सुरुवात झालीये. हे सगळं ज्याचं आहे त्याच्याकडेच जाणारे. तुम्ही लवकरच रस्त्यावर येणारे", अशी भविष्यवाणी गुरुजी करताना दिसत आहे. त्यानंतर दारूच्या अड्ड्यावर एक मुलगी तिच्या वडिलांना घरी घेऊन येण्यासाठी गेल्याचं दिसत आहे. तिचे वडील तिला "तू माझी मुलगी नाहीस. तुला रस्त्यावरुन उचलून आणलं आहे", असं म्हणतात. यामागे नेमकं काय रहस्य दडलं आहे. हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक आहेत.
स्टार प्रवाहवरच्या या नव्या मालिकेत अजय पूरकर, प्राजक्ता केळकर, नेहा नाईक या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. प्रोमो पाहून मालिकेबद्दलची उत्सुकता वाढली आहे. लवकरच ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री नेहा नाईकने ज्ञानेश्वरांची मुक्ताई सिनेमात मुक्ताईची भूमिका साकारली होती.