Star Pravah New Horror Serial Kajalmaya: महाराष्ट्राची लाडकी वाहिनी असलेल्या 'स्टार प्रवाह'वर लवकरच 'काजळमाया' ही हॉरर मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अलिकडेच या मालिकेचा प्रोमो समोर आला होता. प्रोमोने प्रेक्षकांमध्ये एक वेगळीच उत्सुकता निर्माण केली होती. प्रोमोमध्ये दिसणारी सुंदरी नेमकी कोण आहे, असा प्रश्न अनेकांना पडला होता. आता प्रेक्षकांची ही प्रतीक्षा संपली आहे. त्या अभिनेत्रीचं नाव समोर आलंय.
'काजळमाया' मालिकेतून अभिनेत्री रुची जाईल ही मालिकाविश्वात पदार्पण करत आहे. रुची जाईल 'काजळमाया' या मालिकेत पर्णिका नावाच्या चेटकिणीची भूमिका साकारणार आहे. ही व्यक्तिरेखा तंत्रविद्येत पारंगत असलेली एक विलक्षण सुंदर आणि महत्त्वाकांक्षी चेटकीण आहे. महाराष्ट्र टाईम्सशी बोलताना रुची म्हणाली, "ही माझी पहिली मालिका असल्यामुळे मी खूप उत्सुक आहे. लहानपणापासून अभिनेत्री होण्याचं माझं स्वप्न होतं, जे या मालिकेमुळे पूर्ण होत आहे. ही भूमिका खूप आव्हानात्मक आहे. प्रोमो शूट करताना जेव्हा मी स्वतःला चेटकिणीच्या रुपात पाहिलं, तेव्हा मी क्षणभरासाठी घाबरले".
'काजळमाया' या मालिकेत 'बिग बॉस मराठी ४'चा विजेता अक्षय केळकर प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. तो प्रोफेसर आरुष वालावलकर हे पात्र साकारणार आहे, जो एक साधा, सरळ आणि कुटुंबावर प्रेम करणारा कवी मनाचा प्राध्यापक आहे. मालिकेच्या कथानकानुसार, पर्णिकेच्या महत्त्वाकांक्षेला जेव्हा आरुषकडून आव्हान मिळते, तेव्हा एका अद्भुत कथेची सुरुवात होते. स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच सुरू होणारी ही मालिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेईल, अशी अपेक्षा आहे.