Join us  

'या' कार्यक्रमाचे सूत्रसंचलान करणार स्पृहा जोशी आणि सुमीत राघवन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2019 6:30 AM

“मानाचा मुजरा – अमृतयोग” या कार्यक्रमातून साहित्य, संगीत आणि सुरांची मैफल अनुभवण्याची सुवर्णसंधी रसिकांना दिली आहे.

ठळक मुद्दे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्पृहा जोशी आणि सुमीत राघवन यांनी केले आहे

विविध कला, संस्कृती आणि साहित्याचा देदीप्यमान वारसा महाराष्ट्राला लाभला आहे. या कला  परंपरेत अग्रणी असलेले साहित्य आणि संगीताच्या प्रांतातील दिग्गज म्हणजेच महाराष्ट्राचे वाल्मिकी ज्येष्ठ गीतकार ग.दि.माडगूळकर, अवघ्या महाराष्ट्राला खळखळून हसविणारे अष्टपैलू लेखक ‘महाराष्ट्र भूषण’ पु. ल. देशपांडे आणि मराठी माणसाच्या हृदयावर आपल्या सुरांनी आपले नाव कोरणारे ‘बाबूजी’ म्हणजेच लाडके संगीतकार सुधीर फडके...  या त्रयीने आपल्या प्रतिभेने महाराष्ट्रात आपले युग निर्माण केले आणि कित्येक दशके मराठी मनावर कायम अधिराज्य गाजवले. महाराष्ट्रातील या तिन्ही सारस्वतांना त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मानवंदना देण्यासाठी कलर्स मराठीने “मानाचा मुजरा – अमृतयोग” या कार्यक्रमातून साहित्य, संगीत आणि सुरांची मैफल अनुभवण्याची सुवर्णसंधी रसिकांना दिली आहे.  गीत, संगीत, नाट्य आणि नृत्याविष्काराची ही अनोखी मैफल रविवारी ७ एप्रिल रोजी पूर्वार्ध दु.१२ आणि उत्तरार्ध संध्या. ७ वा. फक्त आपल्या कलर्स मराठीवर प्रसारित होणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्पृहा जोशी आणि सुमीत राघवन यांनी केले आहे.

ग. दि. माडगूळकर यांनी वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आणि अल्पावधीत अनभिषिक्त सम्राटपद मिळवले. ग.दि.माडगूळकर आणि सुधीर फडके यांनी मिळून तर मराठी चित्रसृष्टीत आपले एक युग निर्माण केले. त्या दोघांची अनेक अजरामर गीते “मानाचा मुजरा – अमृतयोग” या कार्यक्रमात पुन्हा अनुभवता येणार आहेत. राहुल देशपांडे यांनी “कानडा राजा पंढरीचा” आणि “शब्दावाचून कळले सारे” ही गाणी सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. या बरोबरच हृषिकेश रानडे याने “ऊठ पंढरीच्या राजा”  हे गाणे सादर केले. अजित परब यांनी बाबूजींची काही अजरामर गाणी  या कार्यक्रमात सादर केली. ‘मुंबईचा जावई’ या चित्रपटातील “आज कुणीतरी यावे” हे गाणे सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमातील शरयू दाते हिने सादर केले. तसेच “त्या तिथे पलीकडे” हे चित्रगीत भावगीत गायनात स्वत:चा अनोखा ठसा उमटवलेल्या मालती पांडे बर्वे यांची नात म्हणजेच प्रियांका बर्वे हिने सादर केलेय. सूर नवा ध्यास नवा छोटे सूरवीर या पर्वाची विजेती स्वराली जाधव हिने “फड सांभाळ” ही लावणी आपल्या खास शैलीत सादर करून रसिकांची वाहवा मिळवली. सूर नवा ध्यास नवा छोटे सूरवीर मधील चैतन्य देवढे आणि सई जोशी यांनी देखील सुंदर गाणी सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. साक्षात पु.ल साकारण्यासाठी प्रसिध्द असलेले अतुल परचुरे आणि आनंद इंगळे यांनी पु.लं.चे नाट्यप्रवेश सादर करून रसिकांची वाहवा मिळवली. तर सोनिया परचुरे आणि नकुल घाणेकर यांनी गीतरामायणातील निवडक गाणी नृत्यबद्ध केलीत.

कार्यक्रमामध्ये ग.दि.माडगूळकर, सुधीर फडके आणि पु.ल.देशपांडे यांच्याबद्दलच्या आठवणी, किस्से त्यांच्या जवळच्या व्यक्तींनी म्हणजेच शरतकुमार माडगूळकर, श्रीधर फडके, ज्येष्ठ नेते शरद पवार, ज्येष्ठ संगीतकार आणि व्हायोलीन वादक पं. प्रभाकर जोग, ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, प्रसिध्द अभिनेते सचिन पिळगावकर या मान्यवरांनी जागवल्या आहेत. 

टॅग्स :स्पृहा जोशीसुमीत राघवन