सोनल वेंगुर्लेकर सांगते, ब्रेक-अपनंतर तिला नैराश्य आलं होतं
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2018 13:45 IST
‘साम दाम दंड भेद’मधील नायिका सोनल वेंगुर्लेकरला काही महिन्यांपूर्वी या वेदनादायक अनुभवातून जावे लागले होते. आपल्या तुटलेल्या हृदयाला सांभाळताना ...
सोनल वेंगुर्लेकर सांगते, ब्रेक-अपनंतर तिला नैराश्य आलं होतं
‘साम दाम दंड भेद’मधील नायिका सोनल वेंगुर्लेकरला काही महिन्यांपूर्वी या वेदनादायक अनुभवातून जावे लागले होते. आपल्या तुटलेल्या हृदयाला सांभाळताना तिला नैराश्य आले होते. गेली तीन वर्षे ती आपल्या ‘शास्त्री सिस्टर्स’ मालिकेतील नायक सुमित भारद्वाज याच्या प्रेमात पडली होती. या अवघड कालखंडाबद्दल सोनलने सांगितले, “गेल्या काही वर्षांपासून मला जाणवू लागलं होतं की आमच्या नात्याचं त्याला काहीही महत्त्व वाटत नव्हतं किंवा त्याचं माझ्यावर मनापासून प्रेम नव्हतं. हे नातं फार काळ टिकणार नाही, याची मला जाणीव झाली होती, तरीही मी ते वाचविण्याचा निष्फळ प्रयत्न केला. त्याच्याशी नातं तोडून टाकल्यावर मला नैराश्याने घेरलं होतं आणि या घटनेनंतर त्याने लगेचच दुसर्या मुलीच्या प्रेम पडल्याचे मला दिसताच मी मनाने फारच खचले होते. तुम्ही जेव्हा प्रेमात पडता तेव्हा तुमचं अवघं विश्व त्याच एका व्यक्तीभोवती फिरत असतं. म्हणूनच माझ्या दृष्टीने माझं जगच संपुष्टात आलं होतं. मी मित्रमैत्रिणी तर सोडाच, पण माझ्या कुटुंबियांपासूनही दूर राहू लागले. मी कोणालाच भेटत नव्हते. परंतु मी माझ्या कामाबाबत खूपच दक्ष होते आणि मी त्यावर मात्र कोणताच परिणाम होऊ दिला नव्हता. मला नैराश्याने घेरल्याचं माझ्या आईच्या लक्षात आलं आणि तिने मला त्यातून बाहेर पडण्यास खूप मदत केली. त्याला काही काळ जावा लागला, पण मी त्यातून आता पूर्णपणे बाहेर आले आहे, याचा मला आनंद वाटतो.” या फसलेल्या नातेसंबंधाच्या अनुभवानंतर आपण अधिक आत्मविश्वासू, परिपक्व व्यक्ती झालो आहोत, असं सोनलला वाटतं. “मी आता अधिक व्यवहारी झाले आहे. या अनुभवाने माझा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आणि मी आता अधिक आनंदी झाले आहे,” असे सांगून ती म्हणाली, “प्रेम ही एक सुंदर भावना आहे, पण ते संपुष्टात आल्यास जग संपत नाही. तुम्हाला जरी तसं वाटत असलं, तरी तुमच्या जवळच्या व्यक्तींवर विश्वास ठेवा, कारण तेच तुम्हाला या गर्तेतून बाहेर काढतील.”