लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्रिया मराठेच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. गेल्या दोन वर्षांपासून कर्करोगाशी झुंज देत असलेल्या प्रियाचे वयाच्या अवघ्या ३८ व्या वर्षी निधन झाले. तिच्या या कठीण काळात तिचा पती, अभिनेता शंतनू मोघे तिच्यासोबत खंबीरपणे उभा होता. प्रियाच्या निधनाच्या काही दिवस आधीच शंतनूने एका नव्या मालिकेत एन्ट्री घेतली होती, ज्याचा प्रोमो सध्या चर्चेत आहे.
प्रियाच्या आजारपणाच्या काळात शंतनूने तिची खूप काळजी घेतली. या कठीण परिस्थितीतही तो काम करत होता. प्रियाच्या निधनाच्या काही दिवस आधीच त्याची 'स्टार प्रवाह' वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'येड लागलं प्रेमाचं' मध्ये एन्ट्री झाली. ३० ऑगस्ट रोजी वाहिनीने शंतनूच्या एन्ट्रीचा व्हिडीओ शेअर केला होता.
शंतनू मोघे सोशल मीडियावर फारसा सक्रिय नसतो. त्याची लेटेस्ट पोस्ट याच मालिकेच्या संदर्भात होती. प्रियाही आजारपणामुळे सोशल मीडियापासून दूर होती आणि तिने ११ ऑगस्ट २०२४ रोजी शेवटची पोस्ट शेअर केली होती. प्रियाच्या निधनानंतर अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे. प्रियाने आजवर 'पवित्र रिश्ता', 'या सुखांनो या', 'तू तिथे मी', 'तुझेच मी गीत गात आहे', 'तू भेटशी नव्याने' अशा अनेक मालिकांमध्ये काम केले होते.
प्रिया मराठे आणि शंतनू मोघे २०१२ मध्ये विवाहबंधनात अडकले होते. त्यांची ओळख प्रियाच्या रुममेटमुळे झाली होती. त्यानंतर 'आई' या मालिकेत त्यांनी एकत्र काम केले. मालिकेच्या शेवटी त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला त्यांनी आपले नाते गुप्त ठेवले, पण नंतर कुटुंबाच्या संमतीने थाटामाटात लग्न केले. शंतनु मोघेने 'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले होते.