शाद रंधावा झळकणार चंद्रकांता या मालिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2017 12:33 IST
शाद रंधावाने आशिकी 2, एक व्हिलन, मस्तीजादे, वो लम्हे यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. मोठ्या पडद्यावर खूप चांगल्या भूमिका ...
शाद रंधावा झळकणार चंद्रकांता या मालिकेत
शाद रंधावाने आशिकी 2, एक व्हिलन, मस्तीजादे, वो लम्हे यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. मोठ्या पडद्यावर खूप चांगल्या भूमिका साकारल्यानंतर शाद आता छोट्या पडद्याकडे वळला आहे. तो लवकरच एका मालिकेत प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. चंद्रकांता ही मालिका नव्वदीच्या दशकात प्रचंड गाजली होती. या मालिकेवर आधारित चंद्रकांता ही मालिका काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. यानंतर आता एकता कपूर चंद्रकांता या मालिकेवर आधारित चंद्रकांता याच नावाची मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आणणार आहे. शाद या मालिकेत शिवदत्त ही भूमिका साकारणार आहे. शिवदत्तची या मालिकेत अतिशय महत्त्वाची भूमिका आहे. चंद्रकांताच्या सौंदर्यावर शिवदत्त भाळणार असून त्यामुळे मालिकेच्या कथानकाला अनेक वळणे मिळणार आहेत.शाद छोट्या पडद्यावर काम करण्यास खूप उत्सुक आहे. तो सांगतो, अनेक चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर मालिकेत काम करायचे असे मी कधीच ठरवले होते. पण एखाद्या चांगल्या ऑफरची मी वाट पाहात होतो. चंद्रकांता ही मालिका मी लहानपणी पाहिलेली आहे. ही मालिका माझी खूपच आवडती मालिका होती. त्यामुळे मला शिवदत्त या व्यक्तिरेखेविषयी विचारण्यात आल्याने मी लगेचच होकार दिला. या मालिकेमुळे माझ्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा मिळणार आहे. मोठ्या पडद्यावर मी अनेक नकारात्मक भूमिका साकारल्या असून प्रेक्षकांनी त्यांना पसंती दिली आहे. शिवदत्त या व्यक्तिरेखेला देखील ग्रे शेड्स आहेत. त्यामुळे ही भूमिका मी अधिक चांगल्या प्रकारे साकारू शकतो असे मला वाटते. मी या भूमिकेला योग्य न्याय देईल असा मला विश्वास आहे.